• Mon. Nov 25th, 2024

    अंधेरीत भरणार भूमिगत बाजार; दिल्लीच्या धर्तीवर पालिका करणार उभारणी, सल्लागाराचीही नियुक्ती

    अंधेरीत भरणार भूमिगत बाजार; दिल्लीच्या धर्तीवर पालिका करणार उभारणी, सल्लागाराचीही नियुक्ती

    मुंबई: मुंबईतील रस्ते, पदपथांवर फेरीवाल्यांचे बस्तान आणि पादचाऱ्यांना चालण्यासही नसलेली जागा हे चित्र बदलण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेसप्रमाणेच भूमिगत बाजाराची संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. अंधेरी पश्चिमेला असलेल्या आंब्रे उद्यानाच्या खाली भूमिगत पालिका बाजार विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्तीही केली आहे. सर्वेक्षणासह अन्य कामे केली जात असून साधारण एक महिन्यात अहवाल सादर केला जाईल. या भूमिगत बाजारात सुमारे ५०० दुकाने असतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

    मुंबईतील बहुतांश रस्त्यांना फेरीवाल्यांचा विळखा असल्याने याविरोधात पालिकेच्या वॉर्डकडेही तक्रारी केल्या जात असतात. मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानक हद्दीत तर हे नित्याचेच आहे. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र कारवाईला न जुमानता, पुन्हा फेरीवाले ठिय्या मांडतात. यावर उपाय म्हणून भूमिगत बाजार विकसित करण्याची संकल्पना मुंबई महापालिकेने मांडली आहे. दिल्लीत कॅनॉट प्लेस हे ग्राहकांसाठी खरेदीचे ठिकाण असून या भागात फेरीवाल्यांचा भूमिगत बाजार भरतो. अशाच तऱ्हेने एकाच ठिकाणी फेरीवाल्यांकडून विविध वस्तूंची खरेदी करता यावी, यासाठी मुंबईतही भूमिगत बाजार विकसित करण्याची संकल्पना पुढे आली आहे.
    व्यावसायिक व्हिसावर पुण्यात आली; भाड्यानं रुम घेतली, मात्र भलतचं सत्य समोर, काय घडलं?
    हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतील कॅनॉट प्लेसला १५ जानेवारीला भेट देऊन पाहणी केली. दिल्लीतील कॅनॉट प्लेस साधारण २० हजार चौरस मीटर परिसरात वसले असून खाली भूमिगत बाजार आणि वरील भागात उद्यान आहे. भूमिगत बाजारात ३९८ दुकाने असून या बाजारात प्रवेश करण्यासाठी सात ते आठ प्रवेशद्वारे आहेत. त्याच धर्तीवर अंधेरी पश्चिमेकडील आंब्रे उद्यानाखाली भूमिगत बाजार विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास चार हजार ५९ चौरस मीटरचा हा परिसर आहे.

    तळमजल्यावर वाहनतळ आणि त्यावर दोन मजले दुकाने तयार केली जातील. जवळपास ५०० दुकाने असतील, अशी माहिती देण्यात आली. मैदानांपेक्षा उद्यानांखालीच अशा प्रकारचे आणखी पालिका बाजार करण्याचा विचार आहे. या पालिका बाजाराला साधारण सहा ते सात प्रवेशद्वारे असतील, ज्यामुळे वाहनांना आणि ग्राहकांना सहज प्रवेश मिळेल. तसेच ग्राहकांना बसण्यासाठी जागा आणि या बाजारावर उद्यानही उपलब्ध होईल. बाजाराबाहेर मात्र फेरीवाल्यांना बसता येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले. सध्या या प्रकल्पाचा अभ्यास सुरू आहे.

    बारामतीत जे आजपर्यंत भाजपला जमलं नव्हते ते त्यांनी कुटुंब आणि पक्ष फोडून करण्याचा प्रयत्न केला, रोहित पवारांचा घणाघात

    मुंबईतील फेरीवाल्यांमुळे पादचारी आणि वाहतुकीला होणारे अडथळे पाहता अंधेरीसोबत आझाद मैदानाखालीच भूमिगत पालिका बाजाराचा विचार होत होता. शिवाजी पार्क मैदान आणि ओव्हल मैदानाचाही विचार पुढे आला. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या मैदानांवर कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम करू शकत नसल्याची कायद्यात तरतूद असून त्यासाठी राज्य सरकारलाही नियमात बदल करावा लागेल. त्यामुळे मुंबईतील मैदानांपेक्षा उद्यानांखालीच बाजार विकसित करण्यावर पालिकेचा भर असणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *