अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यालवेळी ते बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा देखील होणार आहे. या सभेत बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. बारामतीतील पाटस रोडवरील वृंदावन गार्डन या मंगल कार्यालयात बारामतीतील तालुका आणि शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि बुथ कमिटी मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी आज सारंच उकरून काढलं.
अजित पवार म्हणाले, जर मी वरिष्ठांच्या म्हणजे शरद पवारांच्या पोटी जन्माला आला असतो, तर पक्ष माझा झाला असता. खरंतर मी सख्ख्या भावाचाच मुलगा होतो ना? मग मी त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही, हे आमचे दुर्दैव. आम्हाला सांगितलं गेलं की, त्यांच्या मुलीला राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आहे, आम्ही मान्य केले. ते म्हणाले, आता आमच्या कुटुंबातील वरिष्ठांसह (म्हणजे शरद पवार आणि दुसरे वरिष्ठ म्हणजे प्रतापराव पवार यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत) मी आणि माझा फक्त परिवार वगळता कुटुंबातील सारे जण माझ्या विरोधात प्रचार करणार आहेत. तुम्ही भावनिक होऊ नका, मला एकटे पाडायचे काम सुरू आहे, असे म्हणताना अजित पवारांना गहिवरून आले.
अजित पवार असे म्हणताच कार्यकर्ते उठले. कार्यकर्ते देखील गहिवरले आणि त्यांनी आत्ताच उमेदवाराचे नाव जाहीर करा, आम्ही त्यांना निवडून आणल्याशिवाय राहत नाही असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या पवित्र्यामुळे काही काळ अजित पवारांना शब्द सुचले नाहीत. अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही यावेळी टीका केली. ते म्हणाले, ‘मी काम करतो. मला कामाची आवड आहे. मला सेल्फी काढायची सवय नाही. पण अलीकडे काही जण फोन करू लागले आहेत, कसे काय, पाणी आहे का? आता हा काय प्रश्न झाला का? लोकसंपर्क आता त्यांना सुचत आहे’.
यावेळी अजित पवार म्हणाले की, पंधरा वर्षात आम्हाला फोन नाही, आता आम्हाला फोन येतो. विचारपूस केली जाते. पाणी कसं आहे, कसलं पाणी शेतीच पाणी की पिकाच पाणी नक्की कसलं पाणी. काय काय आम्ही तुमच्यासाठी केलं आणि तुम्ही विसरून जाताय हे बरोबर नसल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी महायुती केली आहे. बहुतेक महाराष्ट्रातले अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. आम्ही पक्ष बदलतोय तर आमच्या बदनामी करतायत. काही जण नुसते बोलतात, माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. पण, तुम्ही कामं तर केली पाहिजे, भ्रष्टचार होणार कसा, काम करतो त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, असे अजित पवार म्हणाले आहेत.