उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीतील पाटस रोडवरील वृंदावन गार्डन या मंगल कार्यालयात बारामतीतील तालुका व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता व बुथ कमिटी मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेचा इतिहास, गेल्या २३ वर्षातील राष्ट्रवादीचं काम, पवार घराण्यातील आधीचे आणि पक्षातील फूट पडल्यानंतरचे संबंध असं सारंच उकरून काढलं. काही क्षण ते भावुकही झाल्याचं पाहायला मिळालं.
सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा निवडून येणारा खासदार जास्त काम करेल…
संसदेत केवळ भाषणं करून मतदारसंघातले प्रश्न सुटत नसतात. भाषणं करून पुरस्कार मिळवता येतात. पण मतदारसंघातले प्रश्न सोडविण्यासाठी इथे येऊन काम करावं लागतं. फक्त सेल्फी घेऊन काम होत नसतं, अशा शब्दात अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलं. मी फक्त मुंबईत राहून भाषणं केली तर पुरस्कार मिळतील. तीन-चार वेळेला निवडून गेलेल्या खासदारापेक्षा (सुप्रिया सुळे) नवा निवडून येणारा खासदार जास्त विकासकामे करेल, हा माझा शब्द आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला.
मला सांगितलं सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं आहे….
जर मी वरिष्ठांच्या (शरद पवार) पोटी जन्माला आला असतो, तर पक्ष माझा झाला असता. खरंतर मी सख्ख्या भावाचाच मुलगा होतो ना? मग मी त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही, हे माझं दुर्दैव. आम्हाला सांगितलं गेलं की, त्यांच्या मुलीला (सुप्रिया सुळे) राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आहे, आम्ही मान्य केले. प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांना विश्वास घेऊन त्यांना मी तसं सांगितलं, असा दावाही अजित पवार यांनी केला.
आणि अजित पवार यांना गहिवरून आले…
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आता आमच्या कुटुंबातील वरिष्ठांसह (शरद पवार आणि दुसरे वरिष्ठ म्हणजे प्रतापराव पवार यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत) मी आणि माझा फक्त परिवार वगळता कुटुंबातील सारे जण माझ्या विरोधात प्रचार करणार आहेत. तुम्ही भावनिक होऊ नका, मला एकटे पाडायचे काम सुरू आहे, असे म्हणताना अजित पवारांना गहिवरून आले.