• Sat. Sep 21st, 2024
राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल, एकनाथ शिंदेंना विश्वास

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानावरुन सकाळी नऊ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल यावेळी सरकारला सादर करण्यात आला. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सरकार आधीपासूनच आरक्षणाबाबत सकारात्मक होतं, त्यामुळे आंदोलन करण्याची गरज नव्हती, मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित असून ते मुंबईबाहेर असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मराठा समाजाचं आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणं तपासण्यासाठी साडेतीन ते चार लाख जण दिवसरात्र, युद्ध पातळीवर जलदगतीने काम करत होते. सव्वादोन कोटींहून अधिक कुटुंबांचं सर्वेक्षण यात करण्यात आलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. २० तारखेला विशेष अधिवेशनातही याबाबत चर्चा होईल. कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं, ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर कुठलाही अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देता येईल, असा विश्वास मला वाटतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आणि सकारात्मक असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे मराठा समाजाने कुठलंही आंदोलन करण्याची गरज नव्हती, मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. त्याचवेळी कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

मराठा सर्वेक्षण अहवालात काय?

मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठा समाजाच्या बाजूने असून अहवालात मराठा समाज मागास असल्याचं नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा अहवाल आज सरकारसमोर सादर करण्यात आला. येत्या २० तारखेला शिंदे सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. यावेळी मराठा आरक्षणाविषयी स्वतंत्र कायदा केला जाण्याचे संकेत मिळत आहेत.

मराठा आरक्षणावरुन जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाचा आज सातवा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. मुंबई हायकोर्टाने त्यांच्या उपोषणात हस्तक्षेप करत सलाईन लावण्याचे निर्देश दिले होते.

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचं कोल्हापूरमध्ये दोन दिवसीय महाअधिवेशन आज भरत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने एकनाथ शिंदे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी कोल्हापूरला रवाना होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सकाळी साडेआठ वाजता महत्त्वाच्या पत्रकार परिषदेची वेळ दिल्याने राजकीय वर्तुळाचे डोळे लागून राहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed