• Mon. Nov 25th, 2024
    ‘उड्डाणसंख्या घटवा’, मुंबई विमानतळास निर्देश; धावपट्टीच्या व्यग्रतेमुळे आकाशात विमानांच्या घिरट्या

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : उड्डाण करण्यासाठी खोळंबलेली विमाने, उतरणारी विमाने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसणे, व्यग्र असलेली धावपट्टी यांमुळे विमानांना आकाशात तब्बल ४० मिनिटे घिरट्या घालाव्या लागण्याची स्थिती मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्माण झाली आहे. दररोजच्या नियमित ९०० उड्डाणांखेरीज विशेष विमाने, हवाई रुग्णवाहिका, कधी लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टरची ये-जा हे देशातील दुसऱ्या क्रमांकांच्या सर्वाधिक व्यग्र विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळावरील गर्दीचे कारण ठरले आहे. यामुळेच या विमानतळाला नोटीस बजावण्यात आली आहे.

    मुंबई विमानतळाने ११ नोव्हेंबर २०२३ या दिवशी २४ तासांत सर्वाधिक एक हजार ३२ विमानांची ये-जा हाताळली. त्याखेरीज मागील सहा महिन्यांपासून विमानतळावरील दररोजची प्रवासीसंख्या सातत्याने दीड लाखांच्या वर आहे. इतक्या प्रवाशांच्या सुरक्षेसह तपासणीचे आव्हान मोठे असल्याने त्यात अनेकदा विलंब होतो. तसे झाले की, विमानांचे उड्डाण लांबणीवर पडते. प्रवासीसंख्या वाढती असल्याने नियोजित विमानांचा आकडाही नऊशेच्या वर गेला आहे. या कारणांमुळेच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला नोटीस बजावून विमानोड्डाणांची संख्या कमी करण्यास सांगण्यात आले आहे.

    याबाबत विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संबंधित सूत्रांनी सांगितले की, ‘विमानतळावरून दररोज नऊशेहून अधिक विमानांची ये-जा होत असते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व व्यवसायाचे केंद्र असल्याने वेळापत्रकाखेरीज जवळपास ३५ ते ४० विशेष विमानेही येथे येतात. मुंबईत वैद्यकीय उपचारांची मागणी वाढल्याने दररोज चार ते पाच हवाई रुग्णवाहिका येतात. त्यांना प्राधान्याने उतरण्याची परवानगी द्यावीच लागते. अशा परिस्थितीत गर्दीमुळे सुरक्षा तपासणीस विलंब होऊन प्रवाशांच्या बोर्डिंगला वेळ लागला की, उड्डाणांचे वेळापत्रक मागे-पुढे होते. सकाळी तसेच संध्याकाळ ते रात्रीपर्यंत येणाऱ्या विमानांना जमिनीवर जागा नसल्याने त्यांना २० मैल आधीपासूनच ४०-४० मिनिटे घिरट्या घालण्यास सांगितले जात. त्यात हजारो रुपयांचे इंधन खर्ची पडते. यामुळेच डीजीसीएने नोटीस बजावून मार्चअखेरपर्यंत किमान ४० उड्डाणे रद्द करण्याची सूचना दिली आहे.’

    या संदर्भात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडकडे विचारणा केली असता, त्यांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. मात्र या संदर्भात नागरी हवाई वाहतूक संचालनालयाशी (डीजीसीए) चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

    पहिल्या टप्प्यात २० उड्डाणे रद्द
    डीजीसीएने ४० उड्डाणे रद्द करण्यास सांगितले असले, तरीही विमानतळ व्यवस्थापनाने तूर्तास २० उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अकासा एअर व इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाणांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. हळुहळू हा आकडा ४०वर नेला जाणार आहे.

    घिरट्यांचा खर्च किमान १५ हजार रुपये
    भारतात प्रवासी श्रेणीत सर्वाधिक वापरात असलेल्या मध्यम आकाराच्या विमानाला एक किमीसाठी चार लिटर इंधन लागते. २० मैलांच्या घिरट्यांपोटी त्यांचे किमान दीडशे लिटर म्हणजेच १५ हजार रुपयांचे इंधन नाहक खर्च होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *