राज्यातील ९ मंत्री, ४३ आमदार, १३ खासदार असणार उपस्थित:
शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर आणि शिवसेना नाव व चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर शिवसेनेचा पहिलं महाअधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडत आहे. यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून या अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवडतं जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख. कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापूर मधून करायचे यामुळे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच पहिलं महाअधिवेशन कोल्हापुरात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर उद्यापासून सुरू होणाऱ्या या महा अधिवेशनाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील ९ मंत्री, ४३ आमदार, १३ खासदार यांच्यासह जिल्हाप्रमुख व पदाधिकारी २ दिवस कोल्हापुरात अधिवेशनासाठी असणार आहेत. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन अधिवेशनाला सुरुवात करणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
असे असेल महाअधिवेशन:
शिवसेनेचा उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन हे दीड दिवसाचे असून एकूण तीन सत्रात हे अधिवेशन पार पडणार आहे. उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिवेशनाला सुरुवात होणार असून पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे तसेच पक्ष संघटनेच्या आढावा घेतला जाणार आहे. यासोबत पक्षाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय राजकीय ठराव व त्यावर विचार विनिमय होणार आहेत.
तर दुसऱ्या सत्रात सर्व ठराव मंजूर करण्यात येणार असून तिसऱ्या सत्रांमध्ये आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तसेच या अधिवेशनात जेष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये खुली चर्चा देखील या सत्रात होणार आहे. यानंतर अधिवेशनाचा समारोप होणार असून १६ तारखेला सायंकाळी गांधी मैदान येथे जाहीर सभा पार पडणार आहे. सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे शिवसैनिकांची उत्सुकता लागून राहिली आहे.
बॅनर , फ्लेक्स व झेंड्यांनी शहर बनलं भगवमय:
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात शिवसेना शिंदे गटाचे बॅनर फ्लेक्स लावण्यात आले असून संपूर्ण शहरात शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील सुमारे १०० हून अधिक हॉटेल मधील २००० हून अधिक खोल्यांची बुकिंग शिवसेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच दोन दिवस कोल्हापुरात असणार आहेत त्यांच्यासोबत मंत्री आमदार खासदार उपनेते संपर्क नेते जिल्हाप्रमुख सुद्धा उपस्थित असणार आहेत त्यांना राहण्यासाठी हॉटेल बुक करण्यात आले असून शहरात पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.