मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील प्रवास वेगवान व्हावा, तसेच मुंबई आणि भाईंदर ही दोन शहरे जोडली जावीत, यासाठी दहिसर-भाईंदर उन्नत मार्गाची आखणी मुंबई महापालिकेने केली. निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर लार्सन एण्ड टुब्रो (एल ऍण्ड टी) कंपनीला हे काम देण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, पुढील तीन वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही या कंपनीची असणार आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत ही दोन हजार २०० कोटी रुपये आहे. सध्या प्रकल्पासाठी परवानग्या घेण्याचे काम कंपनीकडून सुरू आहे.
या प्रकल्पासाठी ५० टक्के निधी एमएमआरडीकडून उपलब्ध केला जाणार होता. मात्र एमएमआरडीएच्या २०२३-२४च्या अर्थसंकल्पानुसार, मुंबई महानगर प्रदेशात २८ हजार ७०४ कोटी रुपयांची विविध विकासकामे सुरू आहेत. मेट्रोसह अन्य विविध बांधकाम प्रकल्पांचा यात समावेश आहे. त्यामुळे एमएमआरडीएवर मोठा आर्थिक बोजा आहे. हा भार पाहता, पालिकेच्या दहिसर-भाईंदर उन्नत जोडरस्ता प्रकल्पाला निधी देणे शक्य नसल्याचे एमएमआरडीएने पत्राद्वारे कळविले आहे.
दहिसर-भाईंदर उन्नत जोडरस्ता प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडून ५० टक्के निधी उपलब्ध होणार होता. मात्र मुंबईत एमएमआरडीएच्या विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने उन्नत जोडरस्त्यासाठी निधी देऊ शकत नसल्याचे पत्र एमएमआरडीएने पालिकेला पाठवले आहे. निधी न मिळाल्यास मुंबई महापालिका प्रकल्पखर्चाचा भार उचलण्यास समर्थ आहे, असं मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितलं.
मिरा-भाईंदर पालिकेचीही असमर्थता
दहिसर-भाईंदर उन्नत जोडरस्ता प्रकल्प मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतूनही जाणार आहे. या पालिकेकडूनही काही प्रमाणात निधी दिला जाणार होता. मात्र त्यांच्याकडूनही निधी उपलब्ध होऊ शकत नसल्याचे याआधीच स्पष्ट करण्यात आले होते.
असा असेल उन्नत मार्ग
४५ मीटर रुंद, पाच किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग
मुंबई महापालिका हद्दीत १.५ किमी, मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत ३.५ किमी मार्ग
आठ मार्गिकांचा समावेश
बांधकाम कमाल ४२ महिन्यांत करणे अपेक्षित
दररोज ७५ हजार वाहनांकडून वापराचा अंदाज
दहिसर आणि भाईंदर अशा दोन्ही बाजूंसाठी दोन आंतरबदल मार्गिका