कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे सुनावणीसाठी प्रकाश आंबेडकर पुण्यात आले होते. सुनावणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ‘कोणताही नेता कोणत्याही पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यावर फार फरक पडत नाही. पक्ष हा कायम राहतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसवर फार परिणाम होईल असे वाटत नाही,’ असे आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलताना स्पष्ट केले.
‘भाजप भयग्रस्त झाली’
‘चारशेच्या पुढे जाऊ असा दावा भाजप करीत असला, तरी त्यामागे भीती आहे. अशीच भीती निर्माण करण्यासाठी राजकीय; तसेच अराजकीय व्यापारी, मत नोंदवू शकणाऱ्या व्यक्तींवरही ते धाडी घालत आहेत,’ अशा शब्दांत आंबेडकर यांनी भाजपला लक्ष्य केले. ‘भाजप ही भयग्रस्त झाली आहे,’ अशीही टीका त्यांनी केली.
‘भुजबळांनी ओबीसींचे नेतृत्व करावे’
‘ओबीसी संघटनांनी राजकीय पक्ष काढण्याचे आवाहन केले आहे. ओबीसी संघटनांचे छगन भुजबळ यांनी नेतृत्व करावे. त्यांनी सरकारमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन करून नेतृत्व केल्यास आम्ही त्यांना मदत करू. ओबीसींचे आरक्षण राखण्यासाठी भुजबळ काय पावले उचलतात हे पाहू. आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे,’ असे आंबेडकर म्हणाले.