शिंदखेडा तालुक्यातील वर्षी दभाषी गावातील शेतकरी भरत दशरथ बडगुजर (वय ५५) या शेतकऱ्याचे दभाषी शिवारात गट नंबर १२२ क्षेत्र ०.६७ आर शेती असून या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालत आहे. या शेतात यावर्षी त्यांनी हरभऱ्याचे पीकेव्ही २ हे वाण लावलेले होते. हा शेतकरी आपल्या कुटुंबासह काल सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मजूर लावून सदर हरभरा पिक काढून घेऊन, शेतात एकाच ठिकाणी जमा करून नेहमीप्रमाणे रात्री ते घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या शेताशेजारील शेतामलक योगेश माधवराव पाटील हे त्यांच्या शेतात हरभरा गोळा करण्यासाठी आले असता त्यांना भरत बडगुजर यांच्या शेतातील हरभऱ्याचे पीक जळालेले दिसले. त्यांनी लगेच त्यांना फोन करुन तुमच्या शेतातील हरभरा जळाल्याची माहिती दिली.
भरत बडगुजर यांना आपल्या शेतातील आग लागल्याचे कळताच त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न करता शेताकडे धाव घेतली. दरम्यान, हरभरा पीक पूर्णपणे जळाल्याचे लक्षात आले. आपल्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्याचे बघताच शेतकऱ्यालाअश्रू अनावर झाले. दरम्यान शेतकऱ्याने जळालेले पिकाच्या बाजूलाच बसून एकच हंबरडा फोडला. ”हरभरा नेला असता, पण असं करायला नको होतं, असं म्हणत त्यांनी आक्रोश केला. यावेळी इतर शेतकऱ्यांनी त्यांना सावरत त्यांची समजूत काढली. भरत बडगुजर यांनी काढून ठेवलेला संपूर्ण हरभरा जळून खाक झाला असून सुमारे दोन लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी भरत बडगुजर हे आता चांगलेच हतबल झाले असून हरभरा पीक लागवडीसाठी घेतलेले कर्जाचे ओझे कसे फेडावे या विवंचनेत आहे.
मात्र, एका दिवसाआधी काढून ठेवलेला हरभरा नैसर्गिक रित्या जळाला की हरभऱ्याला कोणी अज्ञाताने पेटवून दिले? अशीच चर्चा संपूर्ण गावामध्ये दिवसभर सुरू होती. मात्र, ज्यावेळेस शेतकऱ्याशी संपर्क साधला त्यावेळेस त्याने सांगितले की कोणीतरी हे पीक जाळलेच आहे, असा आरोप त्यांनी केला. आता भरत बडगुजर यांचा हरभरा कसा जळाला की जाळला याचा शोध घ्यावा, अशी शेतकरी आशा करीत असून त्यासंदर्भात पोलीस स्टेशन नरडाणा येथे फिर्याद दिली असून पुढील तपास सपोनि पाटील व पो.कॉ.किरण साळुंखे करत आहेत.