• Thu. Nov 28th, 2024
    अशोक चव्हाण कुठे चाललेत माहिती नाही, पण जिथं जातील तिथे सोबत जाईन, माजी आमदाराचा फुल्ल सपोर्ट

    मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामापत्रात माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. माजी शब्द हाताने लिहिण्यात आलेला आहे. पत्रातील बाकीचा मजकूर छापील आहे. चव्हाण यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्वीकारलेला आहे.

    त्याचदरम्यान, चव्हाणांचा खंदा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले माजी आमदार अमर राजुरकर यांनी देखील राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”मी अशोक चव्हाण यांच्यासोबत आहे. अशोक चव्हाण कोणत्या पक्षात जात आहेत हे मला माहिती नाही. महाराष्ट्र प्रदेश कमिटीमध्ये जे काम चालू आहे, ते गटबाजीला प्रोत्साहन देण्याचं काम सध्या सुरु आहे. काल बऱ्याच आमदारांनी तक्रारी केल्या की, ५२ लोकांच्या पार्लमेंट बोर्डमध्ये काही ज्येष्ठ आमदारंचे नाव नाहीत. पण काही कार्यकर्ते असे आहेत की, त्यांचं वार्डात डिपॉझिट जप्त झालं आहे आणि ते अध्यक्षांच्या पुढे पुढे करतात अशा लोकांना त्यांनी कार्यकारिणीत स्थान दिलं आहे”, अशी नाराजी माजी आमदार अमर राजुरकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

    बरेचसे आमदार या कारणामुळे नाराज आहेत आणि काहीही होऊ शकतं. मी अशोक चव्हाणांचा कार्यकर्ता आहे. त्यांनी मला शून्यातून निर्माण केलं आहे, त्यामुळे मी राजीनामा दिलेला आहे. नागपुरच्या आमदारांचं म्हणणं आहे की, ज्यांची वार्डात निवडण्याची पात्रता नाही, अशा लोकांना या पार्लमेंट बोर्डमध्ये घेतलेलं आहे. जे लोकं लोकांमधून आमदार झालेले आहेत, अशा लोकांना त्यांनी वगळलं आहे. त्यामुळे बरेचजण नाराज आहे. तसेच काँग्रेसचं केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वात समन्वय नाही, असंही माजी आमदार राजुरकर यावेळी म्हणाले आहेत.

    दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. चव्हाण लवकरच भाजप प्रवेश करतील अशी चर्चा आहे. चव्हाण यांचं वर्चस्व आणि वजन पाहता त्यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहू शकतात. काँग्रेसचे आणखी काही आमदारही चव्हाण यांच्या पाठोपाठ राजीनामा देऊ शकतात. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed