याचदरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मॉरिस नोरोन्हा याने ज्या अंगरक्षाकाच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता, त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिश्राला पोलीस कोठडीत नेण्यात येत होतं तेव्हा तो म्हणाला की, ”माझ्यासोबत चुकीचं झालंय, मला फसवलं जातंय, माझी काहीच चुकी नाही”, अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोर असं बोलला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी काही वेगळं वळण लागतं का? हे पाहणं तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.
कशी केली हत्या?
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात वाद होता. अनेक वर्षांपासून त्यांच्यात मतभेद होते. मॉरिस एका गुन्ह्यात तुरुंगात जाऊन आला. यामागे अभिषेक यांचा हात असल्याचा संशय मॉरिसला होता. त्याचा रागातून त्यानं अभिषेक यांची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मॉरिसनं अभिषेक यांच्याशी जवळीक साधली. त्यानंच काल एका कार्यक्रमासाठी अभिषेक यांनी आयसी कॉलनीतील स्वत:च्या कार्यालयात बोलावलं होतं. तिथेच अभिषेक यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.
फेसबुक लाईव्हद्वारे मॉरिस आणि अभिषेक संवाद साधत होते. आम्ही मतभेद संपवून एकत्र येत असल्याचं म्हणत अभिषेक सोफ्यावरुन उठले. तितक्यात मॉरिसनं अभिषेक यांच्यावर समोरुन पाच गोळ्या झाडल्या. मॉरिसनं हल्ला करण्यासाठी त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचं पिस्तुल वापरल्याची माहिती समोर आली आहे. हे पिस्तुल परदेशी बनावटीचं आहे.