• Fri. Mar 13th, 2026
    मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप, लोकल रद्द झाल्याने मोटरमनच्या केबिनसमोर गर्दी; आणखी गाड्या रद्द?

    मुंबई : लोकल अपघातात मृत्यू झालेल्या मोटरमनच्या अंत्यविधीला जाण्यासाठी अन्य मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना आज शनिवारी मनस्ताप सहन करावा लागत आहे. सीएसएमटी स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. प्रवासी मोटरमनच्या केबिनच्या समोर गर्दी करत आहेत. मोटरमन नसल्याने मुख्य आणि हार्बर मार्गावरील ८४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. उद्या रविवार असल्यामुळे बऱ्याच प्रवाशांना घरी लवकर पोहोचण्यास उशीर होत आहे. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना मनस्ताप होत आहे.

    दुपारच्या अडीच वाजेपासून हा गोंधळ सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. रात्रीपर्यंत आणखी लोकल रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. लोकल रद्द झाल्याने प्रवासी संतापले आहेत. आरपीएफ देखील प्रवाशांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. गाडी अनाऊन्स करायला पाहिजे. गाडी लेट आहे, हे कोण सांगणार आहे? असा सवाल प्रवाशांकडून होत आहे. आम्ही अर्ध्या तासापासून स्टेशनमध्ये उभे आहोत. आम्हाला घरी जायचं आहे, कोण सांगणार? असा संताप प्रवाशांकडून होत आहे.

    गाड्या लावल्या आता जा घरी, अशी उत्तरं आम्हाला केबिनमधील ऑफिसरांनी दिले आहे. आमच्यावर काय मेहरबानी करतात का? काही अक्कल आहे का त्यांना, फुकट काम करतात का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. मागच्या एका तासापासून आम्ही इथे ताटकळत उभे आहोत. आम्हाला घर-दार नाही का? अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून येत आहेत.

    मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी रेल्वे सिग्नल धोकादायक पद्धतीने ओलांडल्यामुळे त्यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू होती. अशातच सॅंडहर्स्ट रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान रेल्वे अपघातात त्यांचा काल शुक्रवारी मृत्यू झाला. शर्मा यांच्या पार्थिवावर आज शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, त्यांचे नातेवाईक येणार असल्याने अंत्यसंस्काराची वेळ सायंकाळी ५ वाजता ठेवण्यात आली. शर्मा यांच्या अंत्यसंस्काराचे कारण देत मुख्य आणि हार्बरमार्गावरील शेकडो मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed