• Sat. Sep 21st, 2024
हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या नेत्याला भारतरत्न मिळायला हवा, राज ठाकरे, संजय राऊतांची मागणी

मुंबई : भारताच्या राजकीय पटलावर जनसंघ-भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विचार जोरकसपणे मांडणारे नेते लालकृष्ण अडवणी आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी बिहारमध्ये ओबीसी राजकारणाची पायाभरणी करणारे तसेच तळागाळातील वंचितांचा उद्धार करणारे बिहारचे दिवंगत मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचा गेल्याच आठवड्यात भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने मोदी सरकारने सन्मान केला. आजही पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून त्यांना सन्मान केला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले आहेत?
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो…

बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं.

देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल- राज ठाकरे

संजय राऊत काय म्हणाले?
हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले…आधी २ आणि आता एकदम ३ असे एका महिन्यात ५ नेत्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले पण त्यात ना वीर सावरकर ना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे..

खरं तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त ३ भारतरत्न देता येतात. मोदी यांनी एका महिन्यात ५ जणांना भारतरत्न जाहीर केले. निवडणुकांची धामधूम.. दुसरे काय? कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवानी यांच्या मागोमाग आता चौधरी चरणसिंग, पी वी नरसिंहराव आणि एम एस स्वामिनाथन यांना भाररत्नने सन्मानित केले. आणखी काही नेते प्रतिक्षेत आहेत. पण ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला, ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राममंदिर सोहोळा करू शकले, त्या बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed