पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सोमवारी ईव्हीएम मशीन चोरीचा प्रकार समोर आला होता. यानंतर आता पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांकडून मशीन पोलिसांनी हस्तगत केल्यास आणखी एक आरोपी पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. या गुन्ह्यामध्ये दिसणाऱ्या व्यतिरिक्त आणखी कोण सामील आहे का? याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून अद्याप याबाबतची माहिती दिली जात नाही. मात्र, या संदर्भात सुरु असलेल्या कारवाईला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पुष्टी मिळत आहे.
EVM मशीन चोरी गेल्याने प्रशासकीय कामात हलगर्जीपणा झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घेतली होती. त्याबाबतचे अहवाल देखील त्यांच्याकडून मागवण्यात आला आहे. या घटनेची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली होती. त्यामुळे प्रशासाने तात्काळ दखल घेत या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन केलं आहे.
दरम्यान, साठवलेल्या ४० EVM मशिन्सपैकी एकच डेमो युनिट अज्ञात चोरट्यांनी चोरले. बाकीचे सुरक्षित आहेत. आमची टीम तपासाचा कसून पाठपुरावा करत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या चोरीची सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून शासकीय कामात असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून प्रशासनाकडून देखील तशी तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. मात्र, EVM मशीनच चोरी होऊ लागल्याने नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.