कर्जत येथे राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये पाटील बोलत होते. आमदार रोहित पवार, मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष आणि चिन्हापेक्षा शरद पवार यांचा विचार महत्त्वाचा
पाटील म्हणाले, “दीड वर्षात दोन मोठे पक्ष फोडून लोकशाही धोक्यात आणली गेली. हा नवीन पायंडा राजकारणात पडत आहे. कार्यकर्त्यांचा नेता तुमच्या जीवावर मोठा होत असतो. न्यायालयीन लढाईत आपले पक्षाचे नाव आणि चिन्ह नक्की पुन्हा मिळवू. मात्र जे चिन्ह आणि पक्षाला नाव मिळेल ते जनतेमध्ये रुजविणे आपली जबाबदारी आहे. पक्ष किंवा चिन्हापेक्षा पवार यांचा विचार महत्त्वाचा आहे”.
राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय, कार्यकर्त्यांनो पाठिशी उभे राहा, विजय आपलाच
आता पोलीस ठाण्यात गोळीबार करून न्याय मिळवण्याचा नवीन प्रकार भाजपच्या या राज्यात सुरू झाला आहे. ज्याला गोळी मारली तो मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे. महाराष्ट्रात राजकारणात गुन्हेगारीकरण होत आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याला एक आमदार कमरेत लाथ घालण्याची भाषा करतो. मात्र, त्याला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री साधा शब्द बोलत नाहीत. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या दोन समाजात मनभेद करण्याचे पाप सरकार राजरोसपणे करीत आहे. सध्या राजकीय संकट आहे. मात्र पाठीशी उभे राहा आणि आगामी निवडणुकीत पक्षाचा विचार सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजवावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.