• Mon. Nov 25th, 2024

    कॉंग्रेसच्या गडावर राष्ट्रवादीची नजर; शरद पवार गटाच्या हर्षवर्धन देशमुखांचे नाव चर्चेला, जागा वाटपाकडे लक्ष

    कॉंग्रेसच्या गडावर राष्ट्रवादीची नजर; शरद पवार गटाच्या हर्षवर्धन देशमुखांचे नाव चर्चेला, जागा वाटपाकडे लक्ष

    वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मागील दोन निवडणुकांमध्ये खासदार रामदास तडस यांच्या रुपाने भाजपने या मतदारसंघात कमळ फुलविले. या निवडणुकीसाठी काँग्रेसने माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर डाव लावणार असे चित्र होते. पण, नागपूर जिल्हा बँकेतील घोटाळ्यात केदार हे अडकल्यानंतर काँग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. हीच संधी साधून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने या मतदारसंघावर दावेदारी वाढविली आहे. शिवाजी शिक्षण संस्थेच अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

    वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट, धामणगाव रेल्वे, वरुड-मोर्शी या सहा विधानसभा मतदारसंघांचा वर्धा लोकसभा क्षेत्रात समावेश आहे. सध्या सहापैकी चार आमदार भाजपचे तर काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाचे प्रत्येकी एक आमदार आहे. विद्यमान खासदार भाजपचे रामदास तडस आहेत. तडस हे सत्तरीपार गेल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. सत्ताधारी गटात हे घडत असताना या निवडणुकीत वर्ध्याचा गड परत मिळविण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. जागावाटपात हा मतदारसंघ आपल्याकडे राहणार हा विश्वास कार्यकर्ते सुरुवातीपासून व्यक्त करीत आहेत. महिनाभरापूर्वीपर्यंत माजी मंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शिरीष गोडे, शेतकरी नेते शैलेश अग्रवाल ही नावे काँग्रेसकडून चर्चेत होती. पण, केदार नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात अडकल्याने पक्षापुढे अडचण निर्माण झाली आहे. वर्धा जिल्हा बँकेतील घोटाळ्यांचीही चर्चा वाढली आहे. या परिस्थितीत केदार यांना उमेदवारी दिल्यास अडचण होईल म्हणून काँग्रेस दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे. आमदार कांबळे हे हक्काचा मतदारसंघ सोडून लोकसभा लढण्यास तितकेसे इच्छुक नाहीत. गोडे आणि अग्रवाल यांच्याविषयी पक्षाकडून चाचपणी केली जात आहे. तरीही याशिवाय सक्षम नावाचा पर्याय शोधला जात आहे. आजवर वर्धा लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने तेली विरुद्ध कुणबी उमेदवार असेच समीकरण राहिले आहे. या निवडणुकीतही हेच सूत्र ठरविण्यात आले. केदार यांचे नाव यातूनच पुढे आले होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी वर्धा मतदार संघ काँग्रेसकडे राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

    शरद पवारांकडून तयारीचे आदेश

    काँग्रेसकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अमरावती जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचे नाव पुढे आले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात वरुड, मोर्शी मतदारसंघ येतो. शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देशमुख यांची ताकद दुणावते. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांना वर्धा लोकसभेसाठी कामाला लागण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. खुद्द देशमुख यांनी वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ही माहिती दिली. राष्ट्रवादीकडून ही दावेदारी कली जात असली तरी काँग्रेस कार्यकर्ते हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात राहावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.
    वेध लोकसभा निवडणुकीचा: सोलापुरात काय होणार? भाजपकडून उमेदवार कोण? भाजपच्या हिंदुत्वाला प्रणिती शिंदे टक्कर देणार
    शिंदे, अजित पवार गटाच्याही हालचाली

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ही जागा सुटली तर महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटदेखील माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी वर्धा लोकसभेची जागा मागणार आहे. त्यामुळे पुढे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामनादेखील लढला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव राणा रणनवरे यांनी सुबोध मोहिते यांना जागा मिळेल, असा दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटातून माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे आणि पूर्व विदर्भप्रमुख किरण पांडव यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांच्या बैठकीतूनन झाली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed