बारामती व्यापारी महासंघातर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात एनडीएकडून ४८ जागांचे वाटप होईल. मागे जिथे राष्ट्रवादीचे खासदार होते, त्या जागा आपल्याला मिळतील. या स्थितीत मी माझ्या पक्षाचा उमेदवार तिथे देणार आहे. लोकसभा व विधानसभा या दोन्ही वेळेला मला तुमची साथ लागेल. आपल्या विचारांचा खासदार झाला तर मोदी, शाहांकडून मी हवी तेवढी विकासाची कामे मंजूर करून आणू शकतो. त्यासाठी माझ्याच विचारांचा खासदार असणे आवश्यक आहे. मला खासदारकीला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी वेगळा विचार करेन, त्यावेळी कुणाच्या बापाचे ऐकणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीवेळी काहीजण रडून मदत मागतील पण निकाल तुम्ही घ्या.
आमच्या पक्षाचे सगळेच तिकडे जाणार होते पण……
आमच्या पक्षात सगळे तिकडे जाण्याची भूमिका घेणार होते. सध्या त्या गटात थांबलेले दहा-अकरा लोक पण जाणार होते. मला आता सगळे उघड करायचे नाही. पण सगळे ठरलेले असताना अचानक भूमिका बदलली गेली. माझ्या राजकीय जीवनात मी नेहमीच वरिष्ठांच्या भूमिकेचे समर्थन करत आलो. १९७८ पासून ते राष्ट्रवादीच्या स्थापनेपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. मी स्वतः दोनदा पंजा चिन्हावर आमदार तर एकदा खासदार झालो. मध्यंतरीच्या काळात सरकारमध्ये नसताना कामे थांबले होती. कामांची गती कायम राखायची असेल तर सत्ताधारी पक्षात असणे गरजेचे आहे. आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी आमची भूमिका बदललेली नाही. आजही आम्ही सेक्यूलर भूमिकेवर ठाम आहोत. छत्रपती शिवराय, शाहू-फुले- आंबेडकरांचे विचार घेवून पुढे जाणार आहोत.