• Wed. Jan 8th, 2025

    नेरुळ जेट्टीजवळ फलकांचा अडथळा, चार फ्लेमिंगोंचा धडकून अंत, फ्लेमिंगो सिटीतच करुण वास्तव

    नेरुळ जेट्टीजवळ फलकांचा अडथळा, चार फ्लेमिंगोंचा धडकून अंत, फ्लेमिंगो सिटीतच करुण वास्तव

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नेरूळ येथे उभारण्यात आलेल्या जेट्टीच्या फलकाला धडकून चार फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या परदेशी पाहुण्यांच्या मृत्यूमुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. फ्लेमिंगो पक्ष्यांच्या उड्डाणाच्या मार्गात हा फलक येत असल्याने ही दुर्घटना घडल्याचे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे अपघात होऊन मागील वर्षीही एका फ्लेमिंगो पक्ष्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यावर योग्य तोडगा काढण्याची मागणी आता होत आहे.

    नेरूळमधील खाडीकिनारी असलेल्या जैवविविधतेमुळे या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येत असतात. त्यात फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ‘फ्लेमिंगो सिटी’ अशी नवी मुंबई शहराची ओळख बनली आहे. येथे येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक पक्षीनिरीक्षक या ठिकाणी येऊ लागले आहेत. याच फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाशेजारी खाडीकिनारी नेरूळ जेट्टी उभारण्यात आली आहे. या जेट्टीवरून अजूनही जलवाहतूक सुरू झालेली नाही. या जेट्टीवर प्रवासी जलवाहतूक टर्मिनस असा नामफलक लावण्यात आला आहे. या फलकाला धडकल्याने या चार फ्लेमिंगो पक्ष्यांचा अपघात झाला आहे. सकाळच्या वेळी खाडीकिनारी धुक्याचे वातावरण असते. त्यामुळे पक्ष्यांना उडताना हा फलक दिसला नसावा, परिणामी त्याला धडकून त्यांना जीव गमवावा लागला, असा अंदाज पर्यावरणप्रेमींनी वर्तवला आहे.

    हे चारही फ्लेमिंगो पक्षी या फलकाच्या खाली पडले होते. तिथे आलेल्या एका व्यक्तीने ते पाहून त्यांना नंतर खाडीत टाकून दिले. त्यामुळे पर्यावरणप्रेमींना पुढे काही करता आले नाही. मात्र या प्रकारावर सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    विशेष म्हणजे, या परिसरात आत्ता नुकतीच फ्लेमिंगो पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. स्थलांतराच्या मोसमाच्या प्रारंभीच हा अपघात होऊन, एक नव्हे तर चार फ्लेमिंगो पक्ष्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. यापुढे मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी या परिसरात येत राहणार आहेत. या नामफलकामुळे यापुढेही अनेक पक्ष्यांना धडक लागून अपघात होण्याची शक्यता पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा फलक काढून टाकण्याची मागणी केली जात आहे.

    ईडीला पत्र दिलं, तक्रार केली, पत्रात नेमकं काय लिहिलं रोहित पवारांनी स्वतःच सांगितलं

    फलक काढून टाकण्याची मागणी

    नेरूळ येथे जेट्टीच्या वर लावण्यात आलेला हा फलक २० फूट उंच आहे. भरतीच्या वेळी खाडीकडून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या उड्डाणाच्या मार्गातच हा फलक येतो. गेल्या वर्षी याच ठिकाणी एका फ्लेमिंगो पक्ष्याचा अपघात झाला होता. आता यावर्षी चार फ्लेमिंगो पक्ष्यांना या फलकामुळे जीव गमावावा लागला आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे या ठिकाणी लावलेला फलक सिडकोने त्वरित काढून टाकावा, जेणेकरून आणखी पक्ष्यांना यामुळे इजा होणार नाही, असे पर्यावरणप्रेमी सुनील अग्रवाल यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed