मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून आज संध्याकाळी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. जब वी मेट या नावाच्या या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्र नावच्या विद्यार्थ्याने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. मात्र या नाटकातील संवादांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांनी नाटकाचा प्रयोग उधळून लावला. यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्र या विभागाकडून सादर केलेल्या नाटकांमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता माता यांची भूमिका विदूषकाप्रमाणे दाखवण्यात आली. त्याच बरोबर प्रभू श्रीराम यांना राखी सावंत आणि देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही, तसेच संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका अभाविप पुणे तर्फे घेण्यात आली आहे.
रामलीला सादर करणाऱ्या कलाकारांच्या तालमीचा प्रवास या नाटकात दाखविण्यात आला आहे. नाटक समजून न घेताच गोंधळ घालण्यात आला. नाटकात कोणाचाही अवमान करण्याचा हेतू नाही. हे नाटक रामावर नसून कलाकारांवरचे प्रहसन आहे. कला समजून न घेताच गोंधळ घालणे आणि प्रयोग बंद पाडणे, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याची प्रतिक्रिया कलाकारांनी दिली.