मेट्रो ६ ही जोगेश्वरीच्या स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती महामार्गादरम्यान असलेली १५.३१ किमी लांबीची उन्नत मार्गिका आहे. या मार्गिकेचे बांधकाम ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवर १३ स्थानके असतील. या १३ स्थानकांना जोडण्यासाठी एकूण ७६९ खांबांची उभारणी होत असताना विद्युतीकरणासाठी एमएमआरडीएने निविदा काढली आहे. त्यानंतर आता डबे व त्यासंबंधीच्या अन्य खरेदीसाठीही तयारी केली आहे. -ही मार्गिका जवळपास ६,७१६ कोटी रुपये खर्चून उभी होत आहे. त्यापैकी सर्व सामग्रीचा खर्च २०६४.६३ कोटी रुपये असेल.
नव्याने निविदा
या १५.३१ किमी लांबीच्या मार्गिकेसाठी १८ गाड्यांची गरज भासणार आहे. त्यासाठी एकूण १०८ डबे खरेदी केले जात आहेत. या खरेदीसाठी एमएमरडीएने मागील वर्षीदेखील निविदा काढली होती. मात्र ती निविदा केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नसल्याने मागे घेण्यात आली. एमएमआरडीएने आता पुन्हा निविदा काढली आहे.
निविदेत काय?
या निविदेत डब्यांसह गाडीचे केंद्रीकृत नियंत्रण करणारी प्रणाली, सिग्नल यंत्रणा व संवाद प्रणाली यांचाही समावेश आहे. याखेरीज या मार्गिकेतील गाड्यांचा दुरुस्ती डेपो कांजुर येथील जमिनीवर उभा होणार आहे. त्या कारशेडमधील गाडी दुरूस्तीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचाही या निविदेत समावेश आहे. संबंधित कंत्राटदाराला केवळ गाड्यांचे डबे पुरवायचे नसून ही सर्व सामग्री पुरवायची आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली.