दरम्यान, परिसरात १५ फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी अमळनेर, धरणगाव, शेंदुर्णी, चोपडा येथून फिरते शौचालय मागवण्यात आले आहेत. प्रत्येक सभागृहाजवळ दोन फिरते शौचालय ठेवण्यात आले आहेत. या शौचालयाची सकाळी, दुपारी व सायंकाळी अशा तीन वेळा सफाई कर्मचारी स्वच्छता ठेवणे, पाण्याची व्यवस्था करीत आहेत. अमळनेर नगरपरिषदेचे टँकर या शौचालयाना सतत पाणी पुरवणार आहे, तर एक व्हॅक्युम क्लिनरही येथे ठेवण्यात आले आहे.
५० कर्मचारी करताहेत स्वच्छता
गेल्या १० दिवसांपासून अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे ५० कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती केली आहे. ते २४ तास परिसरात स्वच्छता ठेवत आहेत. त्यांच्यावर नियंत्रणासाठी आरोग्य निरीक्षक संतोष संदानशिव, नितीन बिराडे, राम कलोसे हे काम पाहात आहेत.
‘वासुदेव’ करतोय घरोघर साहित्य संमेलनाबाबत जनजागृती
९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या संमेलनाचा प्रचार आणि प्रसार हा ‘वासुदेवा’च्या रुपातून करण्यात येत आहे. साहित्य संमेलनाची माहिती शहरातील घरोघरी जावून जनजागृती करीत आहे. ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे. त्या अनुषंगाने बुधवारी शहरातील विविध भागात या वासुदेवाने प्रचार केला.
तब्बल ७२ वर्षांनंतर होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन हा वासुदेव करत आहे. अलीकडे कालबाह्य होत चाललेला ‘वासुदेव’ शहरवासीयांना दिसला. २५ जणांची ही टीम होती. अमळनेर शहरात रेल्वे स्टेशनपासून सुरुवात करून स्वामीनारायण मंदिर, आठवडे बाजार, कोंबडी बाजार, जुने अमळनेर कचेरी रोड मार्गावर दिवसभर या वासुदेवाने प्रचार केला.