• Sat. Sep 21st, 2024
सरकारने जरांगेंपुढे मान तुकवल्याने ओबीसी आक्रमक, नगरला भुजबळांचा ओबीसी एल्गार मेळावा

अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसींचे आरक्षण बचावाच्या मागणीसाठी ओबीसी समाज संघटना एकटवटून आणखी आक्रमक झाल्या आहेत. मराठा आंदोलनाच्या यशानंतरचा पहिलाच आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा ३ फेब्रुवारीला नगरला होत आहे. त्यामध्ये लाखो लोकांना एकत्र आणून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. मेळाव्याला ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला खांदा दुखावल्याने आठवडाभर उपचार आणि विश्रांती घेत असल्याचे जाहीर केल्याने त्या या मेळाव्यास येणार नसल्याचे दिसते. तर दुसरीकडे संयोजकांनी सभेच्या प्रवेशद्वाराला माजी केंद्रीय मंत्री कै. बबनराव ढाकणे यांचे नाव देऊन सर्वसमावेशकता साधण्याचा प्रयत्न केला आहे.

मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहणार?

अहमदगर नगर शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर ३ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे. ओबीसी नियोजन मंडळाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. मेळाव्याला अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, आमदार राम शिंदे, कल्याणराव दळे, प्रा. लक्ष्मण गायकवाड, शब्बीरभाई अन्सारी, पी.टी. चव्हाण, दौलतराव शितोळे, सत्संगजी मुंढे, प्रा. लक्ष्मण हाके हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

ओबीसींची पहिली भव्य सभा

संयोजन समितीतर्फे सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध नाही. परंतु ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र वर्गातून आरक्षण द्यावे ही भूमिका ओबीसी समाजाची आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचा ड्राफ्ट राज्य सरकारकडून जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये ओबीसींची पहिली भव्य सभा होणार आहे. या मेळाव्यात ओबीसी नेते मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी ओबीसी समाजाच्या वतीने पुढे करण्यात येत आहे.

या मेळाव्याला नगर जिल्ह्यातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत. या सभेसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर शहरातील पार्किंगची व्यवस्था पांजरापोळ संस्थेचे मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ, मार्केट यार्ड चौक, वायएमसी मैदान, खालकर हॉस्पिटल जवळ, अहमदनगर बॉईज हायस्कूल मैदान, कोठी रोड येथे करण्यात आलेली आहे.
सभेच्या ठिकाणी अप्लोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कै. बबनराव ढाकणे यांचे नाव प्रवेशद्वाराला

कै. बबनराव ढाकणे यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. या मेळाव्यास चार ते पाच लाख ओबीसी समाज या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला. तरी या महाएल्गार मेळाव्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed