• Sat. Sep 21st, 2024
मुंबईत किरण सामंत आणि विजय वडेट्टीवर यांची भेट, कोकणात राजकीय उलथापालथ पक्की?

रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांच्या सोशल मीडियावरील लक्षवेधी पोस्टमुळे ते चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय महत्वकक्षां बऱ्याचदा त्यांच्या पोस्टमधून दिसून येतात. आज किरण सामंत यांनी थेट काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुंबईत भेट घेतल्याने कोकणात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भेटीने कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून वर्तवली जात आहे.

किरण सामंत अलीकडे नाराज असल्याची चर्चा आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी किरण सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार आहेत. मात्र या जागेवर भाजपकडून प्रबळ दावा करण्यात येतो आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

अलीकडेच फेसबुकवर त्यांनी एक पोस्ट केली होती. काही तासांतच त्यांनी ती डिलीट केली. दुसरीकडे किरण सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या व्हाट्सअप स्टेटस वरती मशालीचा फोटो ठेवला होता. तेव्हाही ते चर्चेत आले होते. शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत असले तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती भाजपाने आपला प्रबळ दावा केला आहे. भाजपकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही या जागेवरून कोणीही भाष्य अथवा बॅनरबाजी करू नये अशा शब्दात कान टोचले होते.

दरम्यान राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी किरण सामंत यांनी केलेली पोस्ट आपल्या स्वत:च्या ट्विटरला टाकून ‘सामंत बंधूंनी एकत्रच राहावे, कोणाचेही घर फुटू नये यासाठी प्रयत्न करावे. ही शिकवण पवारसाहेबांची आहे, असे सांगताना किरण सामंत यांच्या मनातील द्वंद्व अधोरेखित केलं होतं. त्यामुळे या सगळ्या विषयावरून किरण सामंत यांची नाराजी नक्की कोणावर आहे? याबाबत आता जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांचे नाव शिंदे यांच्या शिवसेनेकडून चर्चेत असतानाच अलीकडे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघावरती किरण सामंत यांची सुकन्या अपूर्वा किरण सामंत हिनेही भेटीगाठी व राजकीय दौरे सुरू केल्याने राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघावरही किरण सामंत लक्ष ठेवून असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed