गडचिरोली जिल्हा मुख्यालयाजवळील कनेरी येथे जन्मलेल्या रमेश कावळे यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड झाल्याने गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयाजवळील कनेरी येथे रमेश कावळे यांचा जन्म झाला. त्यांनी नवोदय विद्यालय घोट येथे सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बीएससीचे शिक्षण नेवजाबाई हितकारिणी, ब्रहमपुरी, एमएससी (रसायनशास्त्र) नागपूर विद्यापीठातून, बीई (फायर इंजिनीअरिंग) नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूरमधून पूर्ण केले. १३ मे २००४ रोजी आसामच्या शिवसागर येथे तेल आणि नैसर्गिक वायू कॉपरिशन लिमिटेड (ओएनजीसी) फायर सर्व्हिसेसमध्ये अग्निशमन अधिकारी म्हणून ते रुजू झाले.
त्यांच्या १९ वर्षांच्या सेवेदरम्यान त्यांना ऑपरेशनल क्षेत्र, प्रशिक्षण संस्था आणि ऑफशोअरमध्ये (समुद्र क्षेत्रात) काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. रमेश कावळे यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे. आसाम ॲसेटमधील रमेश कावळे यांनी कार्यकाळात, २००५ मध्ये ऑइल इंडिया लिमिटेडच्या डिकॉम वेल क्रमांक १५ मध्ये झालेल्या धक्क्यादरम्यान अग्निशमन कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. जो सुमारे एक महिना चालला होता. शिवसागरमधील पेट्रोलपंपाला लागलेली आग, जोरहाटमधील मोठ्या इमारतीला लागलेली आग, तेल व गॅस पाइपलाइनला लागलेल्या आगीमध्ये त्यांनी अग्निशमन कार्याचे नेतृत्व केले आहे.
ओएनजीसीची प्रमुख प्रशिक्षण संस्था आईपीएसएचईएम गोवा येथे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अग्निशमन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात मोठे योगदान दिले आहे. अग्निशमन प्रशिक्षण सिम्युलेटर आणि संस्थांमध्ये सुविधा विकसित करण्याच्या त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे अग्निशमन प्रशिक्षण मानकांमध्ये सुधारणा करण्यात खूप मदत झाली आहे.
रमेश कावळे यांनी ऑफशोर बीपीबी आणि बी १९३ प्लॅटफॉर्म येथे त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी बीॲण्डएस मालमत्तेच्या बीपीबी प्लॅटफॉर्मवर २ वर्षे सेवा केली आहे. त्यांनी अग्निशमन यंत्रणेची तपासणी, चाचणी आणि देखभाल पद्धती सुधारल्या आहेत. आगीच्या घटना रोखण्यात मदत करणाऱ्या सर्व महत्त्वाच्या कामांचे निरीक्षण आणि पर्यवेक्षण केले आहे. त्यांनी प्लॅटफॉर्मचे अग्निशमन अधिकारी, हेलिकॉप्टर लँण्डिंग अधिकारी आणि आरोग्य आणि सुरक्षा अधिकारी म्हणून विविध पदांवर काम केले आहे. बी १९३ प्लॅटफॉर्म, बीॲण्डएस मालमत्ता येथे सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांचे उल्लेखनीय योगदान प्रशंसनीय आहे. त्यांनी बी १९३ प्लॅटफॉर्मची अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
ओएनजीसीचे उच्च हायड्रोजन सल्फाइड वायू प्लॅटफॉर्म असल्याने, त्यांनी प्लॅटफॉर्मवर उच्च दर्जाची सुरक्षा प्रणाली आणि व्यावहारिक प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करण्यात योगदान दिले आहे. त्यांनी अशा प्रकारचे एक ‘फायर ॲड सेफ्टी एक्झिबिशन सेंटर’ बनवले आहे, ज्याचे माजी संचालक (ऑफशोअर), संचालक (वित्त) आणि ओएनजीसी आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामधील अनेक मान्यवरांनी कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली, बी १९३ प्लॅटफॉर्मने २०१५ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट फायर सेफ ऑफशोर प्लॅटफॉर्म अवॉर्ड, २०१४ मध्ये तेल उद्योग सुरक्षा निदेशालय अवॉर्ड, २०१६ आणि २०१७ मध्ये कॉर्पोरेट एचएसई एक्सलन्स अवॉर्ड जिंकले. ग्रीनटेक फाउंडेशनने २०१५ मध्ये सेफ्टी चॅम्पियन म्हणून सन्मानित केले आहे.
मेहसाणा (गुजरात राज्य) ॲसेटमधील त्यांच्या वर्तमान कार्यकाळात त्यांनी प्रशिक्षणार्थीना जागरुकता आणण्यासाठी वेगवेगळे फायर मॉडेल्स विकसित केले आहेत. औद्योगिक आग, रासायनिक आग, कागद उद्योगातील आग, एलपीजी टँकर गळती, दूधसागर डेअरीला आग, जगुदान, मेहसाणा आणि रिंग जीटीसी १००-७ वर ब्लोआउट (अत्यत धोका असलेले) येथे मोठ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, मेहसाणा ॲसेटने २०२१ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट मुख्य अग्निशमन स्टेशन पुरस्कार’ जिंकला आहे हे विशेष.