माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम हे सोमवारी दुपारी सोलापुरातील आशा वर्करच्या आंदोलनात सहभागी झाले होते. भाषणानंतर नरसय्या आडम यांनी माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणेंना समज देण्याचा प्रयत्न केला. सोलापुरातील माळशिरसमध्ये येऊन नितेश राणे यांनी चिथावणीखोर भाषण केलं. त्यांच्या भाषणावर आडम यांनी कडाडून टीका केली.
राज्यात बॉस कोणी नाही, तसे असेल तर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नितेश राणे यांनी वादग्रस्त आवाहन केलं होतं. पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर दोन चापटा मारून या, तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. एकच फोन आला पाहिजे. नितेश साहेब कार्यक्रम केलाय आता आम्हाला वाचवा… कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला सुखरूप घरी पोहोचविण्याची जबाबदारी आमची असणार… पोलिसांसमोर बोलतोय. माझं काही वाकडं होणार नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, असं नितेश राणे म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर आडम मास्तरांनी संताप व्यक्त केला.
हे राज्य म्हणजे जंगल राज्य आहे काय? देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत पाच वर्षे आमदार म्हणून काम केलंय. फडणवीसांनी कधी अशा शब्दांचा किंवा वाक्याचा उपयोग केला नाही. भाजपचे आमदार नितेश राणे बेताल वक्तव्य करत असतील तर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. बॉस कुणाला म्हणतात.. गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये बॉस असतो, अशी टीका आडम मास्तर यांनी केली.
प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रात सर्व जागा लढवू नये, इंडिया आघाडीत यावं: नरसय्या आडम
वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व जागा लढविणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी माढ्यात म्हटलं होतं. यावर माजी आमदार नरसय्या आडम यांनी आंबेडकरांनी सर्व जागा लढू नये, अशी विनंती केली आहे. इंडिया आघाडीमध्ये राहून आपल्या ताकदीप्रमाणे जागा वाटप करून घ्यावे, अन्यथा मोदींना रान मोकळं मिळेल. देशातील घटना वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना सन्मानाने इंडिया आघाडीत सामावून घ्यावे आणि जागा वाटप करून घ्यावे, अशी विनंती आडम मास्तर यांनी केली आहे.