हे तिघे रात्री पार्टी करून येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की, तिघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत भर चौकात पडले होते. मध्यरात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या नजरेस मृतदेह पडले आणि तिघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती कळताच नातेवाईकांनी सोमवारी सकाळपासून शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी केली.
ती पार्टी अखेरची ठरली
निखिल कोळी याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. रविवारी निखिलने एका कार्यक्रमात मंडप बांधले होते. निखिलला रविवारी एका कार्यक्रमामधून मंडपचे भाडे आले होते. निखिलने दोन्ही जवळच्या मित्रांना रविवारी रात्री पार्टीचे आमंत्रण दिले. इरण्णा मठपती, दिग्विजय सोमवंशी, निखिल कोळी या तिघांनी सोलापुरातील एका हॉटेलमध्ये जंगी पार्टी केली. पार्टी करून पल्सर या दुचाकी वाहनावरून घरी परत जाताना महावीर चौकात दुचाकी डिव्हायडर आणि फूटपाथला जोरात धडकली. अपघात इतका भीषण होता की तिघे मित्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आदळले. तिघांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला, रक्तबंबाळ होऊन निखिल, दिग्विजय, इरण्णा यांचा जागेवरच मृत्यू झाला.
नातेवाईकांचा शासकीय रुग्णालयात आक्रोश
निखिल कोळी आणि इरण्णा मठपती हे घरात एकुलते एक होते. इरण्णा हा दुचाकी शोरूममध्ये नोकरीला होता, तर दिग्विजय सोमवंशी याचा कटिंग दुकानाचा व्यवसाय होता. तिघांवरही कुटुंबाची जबाबदारी होती. मात्र, एका पार्टीमुळे तिघांना आपला जीव गमवावा लागला. तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल झाल्यानंतर सोमवारी २९ जानेवारी रोजी सकाळी नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. नातेवाईकांचा व मित्र मंडळीचा प्रचंड आक्रोश शासकीय रुग्णालयात पाहावयास मिळाला.