• Sat. Sep 21st, 2024
हिंदी राष्ट्रभाषा नाही, महाराष्ट्रातील सर्व भाषिक शाळेमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी : राज ठाकरे

नवी मुंबई : एकीकडे अमेरिकेत मराठी शाळा चालू होत असतांना महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत, या विषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाशी येथे एका कार्यक्रमात खेद व्यक्त केला. शासनाच्या वतीने आयोजित विश्व मराठी संमेलन २०२४ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई मध्ये विश्व मराठी संमेलन २०२४ चे आयोजन सिडको एक्झिबिशन येथे सुरू आहे. ह्या एक्झिबिशनचा आजचा हा दुसरा दिवस आहे. महाराष्ट्र शासनाच्या द्वितीय विश्व मराठी संमेलनास राज ठाकरे यांनी उपस्थित राहून मराठी साहित्य प्रेमींशी संवाद साधत असताना मराठी भाषेवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोले लगावले. तसेच महाराष्ट्रमध्ये मराठी शाळा बंद होतात तर अमेरिका मध्ये मराठी शाळा सुरू होतात हे काही कमी नसल्याचे सांगितले. महाराष्ट्रामध्ये राहून जेव्हा हिंदी कानावर येते तेव्हा त्रास व्हायला लागतो, असंही ते म्हणाले.

हिंदी राष्ट्रभाषा नाही

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मी मराठीसाठी महाराष्ट्रात कारागृहात गेलो आहे. मी कडवट मराठी आहे. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही. असे असले, तरी हिंदी ही आमची राष्ट्र भाषा नाही. कारण देशाची राष्ट्र भाषा अद्याप निश्चित झाली नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शासकीय पत्रव्यवहारासाठी (करस्पॉंड) हिंदी भाषेचा वापर केला जात असल्याच्या मागील वक्तव्याचा ठाकरे यांनी पुनरुच्चार केला.

सर्व भाषिक शाळेमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी

मराठी भाषा उत्तम आणि समृद्ध आहे; मात्र आज ती बाजूला सारण्याचा प्रयत्न होतो, ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. आपल्याकडील शाळांमध्ये जर्मन, फ्रेंच आदी भाषा शिकवल्या जातात तशा स्थानिक भाषा शिकवणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने येथील सर्व भाषिक शाळेमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी, अशी मागणी ठाकरे यांनी या वेळी केली.

मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या राज्याविषयी प्रेम वाटते. यासाठी देशातील सर्वात मोठा पुतळा गुजरातमध्ये करण्यात आला आहे. अन्य गोष्टी त्यांच्या राज्यात होत आहे. हिरे व्यापारही तिकडेच नेत आहेत. जर त्यांना त्यांच्या राज्या विषयीचे प्रेम लपवता येत नसेल, तर आम्ही आपल्या मराठी भाषा आणि राज्य या विषयीचे प्रेम का लपवतो, असा प्रश्न उपस्थित करत आपण मोदी यांच्यावर ही टीका केली नाही,असे स्पष्टीकरण ठाकरे यांनी दिले.

मराठी माणसाला घर नाकारले जाते हे सरकारचे गळचेपी धोरण

मराठी माणसाला मुंबईत घर जैन सोसायटीत घर घेऊ देत नाही. हे अन्य राज्यात करून दाखवा. हे येथे का होते, तर आमचे बोटचेपे धोरण याला कारणीभूत आहे. आम्ही काय गोटे आहोत का ? कोठेही घरंगळत जाण्यासाठी, असा संताप ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला. आपण यापूर्वी कोणीही समोर येऊ द्या मराठीत बोला, असे सांगितल्यवर चित्रपट क्षेत्रातील मंडळीही मराठीत बोलू लागली आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी येत होत पण बोलत नव्हते. एखाद्याला नीट मराठी बोलता आले नाही,तर त्यांना हसू नका, त्यांना सुधारा, असे आवाहन ठाकरे यांनी या वेळी केले.

दीपक केसरकर म्हणाले की, या वर्षी पासून सर्व भाषिक शाळांना मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. तरुणांमध्ये मराठी भाषा टिकून रहावी, त्यांना आवड वाटावी यासाठी मराठी युवक मंडळ स्थापन केले आहे. मराठी भवन बांधण्याचा २४९ कोटींचा प्रकल्प आहे. यासाठी शिक्षण विभागाची जागा दिली आहे. सर्व मराठी संस्था मुंबईत रहातील, मराठी भाषा विभाग कार्यरत राहील. काशीला होणाऱ्या संमेलनासाठी निधी देणार असून राज्यातील सहा विभागात मराठी भाषा संमेलन घेणार आहे. पुढे प्रत्येक जिल्ह्यात संमेलन घेण्यात येणार आहे. संत साहित्य संमेलनला निधि कायम दिला जाईल. वाई येथे मराठी विश्व कोश मंडळाची इमारत बांधण्यात येणार आहे. या वर्षीपासून विदेशात होणाऱ्या मराठी भाषा संमेलनासाठी निधिची तरतूद करण्यात येणार आहे, अशी केसरकर यांनी घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed