• Mon. Nov 25th, 2024

    नाट्य रंगभूमीला लोकाश्रय मिळाला पाहिजे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    ByMH LIVE NEWS

    Jan 28, 2024
    नाट्य रंगभूमीला लोकाश्रय मिळाला पाहिजे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    सोलापूर दि.28 (जिमाका) :- नाट्य रंगभूमी पुढे येण्यासाठी  लोकाश्रय मिळावा. रसिकांनी कलाकारांच्या पाठीशी उभे राहावे, ज्यायोगे नाटकांचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

    100 व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाचा  हस्तांतरण सोहळा नॉर्थकोट मैदान, सोलापूर येथे आज रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे  कोषाध्यक्ष सतीश लोटके, सिने कलाकार किशोर महाबोले, नीलम शिर्के सामंत, दीपक करंजीकर,अशोक हांडे, अतुल परचुरे, सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा,प्रा. शिवाजी सावंत, कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रमुख कार्यवाह विजयदादा साळुंके, कार्याध्यक्ष अविनाश महागावकर, समन्वयक मोहन डांगरे, स्वागत सचिव प्रशांत बडवे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील नाट्य परिषदेच्या शाखेचे अध्यक्ष उपस्थित होते.

    यावेळी पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी या देशातील रंगभूमी टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी रंगभूमी सर्वोत्तम असल्याने ती टिकविणं, जगविणं आपली जबाबदारी आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात नाटकाचा भाव पोहोचून रसिकांनी तिकीट काढून नाटक पाहावे आणि महाराष्ट्रात या माध्यमातून नाट्य रसिकांची संख्याही वाढावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यापीठातून युवा कलावंत निर्माण व्हावेत यासाठी शासनाकडून विद्यापीठाच्या कला विभागास अनुदान देण्यात येते. कला विभागाला ज्यादा चा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

    संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल म्हणाले, राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या काळात. राज्यातील कलाकारांना तसेच संगीताला कलाक्षेत्राला राजाश्रय दिला. तसा राजआश्रय आता मिळावा. ही सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याचे काम नवी पिढी करणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना नाट्य, संगीताचे शिक्षण दिले गेल्यास त्यांची सांस्कृतिक जाण अधिक प्रगल्भ होईल. विद्यापीठातून उत्तम नट, गायक तयार व्हावेत यासाठी विद्यापीठातील कला विभागाला शासनाने आर्थिक सहकार्य करावे. यासाठी विद्यापीठाला 5 कोटींचा निधी द्यावा. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नव कलावंत तयार होतील. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबई पुण्यात होणारी उत्तम व व्यावसायिक नाटके सोलापुरात होण्यासाठी नाट्य परिषदेने जिल्हास्तरीय समिती स्थापन करून उत्कृष्ट नाटक आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी यावेळी सांगितले.

    शासनाने नाट्य संमेलनासाठी 9 कोटी 33 लाख रुपये दिले असून या निधीतून नाट्य परिषद विविध उपक्रम राबविणार आहे. 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पाच महिने सुरु राहणार असून या संमेलनाचा सांगता सोहळा रत्नागिरीत होणार आहे. याशिवाय या पाच महिन्यांच्या नाट्य संमेलनाच्या कालावधीत सर्व कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आणि स्पर्धा घेण्यात येणार आहे. शासनाने ज्येष्ठ व गरजू कलावंतांना आरोग्य,  घरकुल आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नाट्य परिषद  नाट्यकर्मीसाठी विविध योजना राबविणार असल्याचे यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी सांगितले.

    यावेळी संमेलनाचे कार्यवाह विजय दादा साळुंखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सोलापूर येथे 100 व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलन पार पडण्यासाठी यशस्वीरित्या काम केल्याने पालकमंत्री श्री. पाटील यांनी कौतुक करून स्वतःच्या हातातील घड्याळ विजयदादा साळुंके यांना भेट दिले. यावेळी श्री साळुंखे रंगमंचावरच भावूक झाले.

    यावेळी शोभा बोल्ली यांच्या नटरंग या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सोलापूर येथील सर्व रंगकर्मी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

    यानंतरचे नाट्यसंमेलन बीड येथे होणार असल्याने नटराजची मूर्ती आणि नाटकाची घंटा बीड शाखेकडे  सुपूर्त  करण्यात आली.

     

    ‌‌ ००००००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed