• Mon. Nov 25th, 2024

    सर्वांगीण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Jan 28, 2024
    सर्वांगीण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. 28 : मुल तालुक्यात विविध लोकोपयोगी विकासकामे हाती घेण्यात आली आहे. मुख्य रस्ता, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, तसेच शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, कृषी महाविद्यालय, महिलांच्या पंखांना बळ देणारे सर्वोत्कृष्ट शुरवी महाविद्यालय यासारखे मोठे प्रकल्प उभे राहत आहे. मुल तालुक्याचा चेहरा- मोहरा बदलविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांगिण विकासातूनच हा तालुका महाराष्ट्रात अव्वल करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    मुल नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार रवींद्र होळी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यशवंत पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वसुले, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, संध्या गुरनुले,  प्रभाकर भोयर, रत्नमाला भोयर, चंदू मारगोनवार, नंदू रणदिवे आदी उपस्थित होते.

     

    देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो शहिदांनी प्राणाची आहुती दिली, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, देशाला संविधान अर्पण होऊन 74 वर्षे पूर्ण झालीत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दायित्व, कर्तव्य व जबाबदाऱ्या संविधानामध्ये लिखीत स्वरूपात दिल्या. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष असून मुलचा गौरव वाढवीत छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलाची निर्मिती करण्यात आली.

    सर्वप्रथम जेव्हा स्व.दिलीप पारधी यांच्यासमवेत मुल येथे आठवडी बाजार बघण्यासाठी आलो. तेव्हा चिखल, कच्चा रस्ता व घाणीचे साम्राज्य होते. आता या ठिकाणी सुसज्ज अशा आठवडी बाजाराची निर्मिती करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले या नावाने हे आठवडी बाजार सेवेसाठी लोकार्पित करीत आहे. महात्मा फुलेंनी “शेतकऱ्यांचा आसुड” हे पुस्तक लिहून शेतकऱ्यांसाठी असलेला भाव व्यक्त केला. हा बाजार येथील शेतकरी बांधवासाठी निश्चितच सेवा देईल,असा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    महर्षी वाल्मिकीच्या नावाने मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार उभारण्यात आले. प्रवेशद्वाराची निर्मिती व्हावी, यासाठी भोई समाजाच्या नागरिकांची मागणी होती. सदर प्रवेशद्वारासाठी 50 लक्ष रुपये मंजूर केले. मात्र, जागेअभावी 25 लक्ष रुपये खर्च करून गेटची निर्मिती झाली. या प्रवेशद्वारातून जातांना महर्षी वाल्मिकीचे स्मरण निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिल्लक 25 लक्ष रुपयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने दुसरे अटल गेट उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    पुढे बोलतांना श्री. मुनगंटीवार म्हणाले, दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर शहीद स्मारकाची (म्युरल) निर्मिती करण्यात आली. या स्मारकामध्ये शहीद भगतसिंगाची प्रतिकृती आहे. स्वातंत्र्यासाठी “मेरा रंग दे बसंती चोला” म्हणत भगतसिंग हसत-हसत फासावर गेले. ते स्मारक येथील तरुण-तरुणींच्या आयुष्याचे उद्दिष्ट ठरवेल. या तरुणांमध्येही देशासाठी काही करावयाचे आहे, हा भाव निर्माण होईल.

    मुल येथे मुख्य रस्ता, कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृह, तहसील कार्यालय, पंचायत समितीची इमारत, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, इको पार्क, स्विमिंग टॅंक, आठवडी बाजार असे विविध विकासकामे तालुक्यात झाली. 100 खाटांच्या मुल उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळाली. सोमनाथ येथे भव्य कृषी महाविद्यालय उभे राहत आहे. तसेच मुलींसाठी शुरवी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या 5 वर्षात जिल्ह्यातील महिलांच्या पंखांना बळ देणारे शुरवी महाविद्यालय सर्वोत्कृष्ट होईल. जगातल्या उत्तम विद्यापीठाशी हे महाविद्यालय जोडण्यात येईल. या माध्यमातून मुलची विद्यार्थिनी प्रशासकीय अधिकारी होऊन मुलचा गौरव वाढवेल.

    चंद्रपुरातील मोरवा येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्यात येत असून एअरपोर्ट विकसित करण्यात येत आहे. गरीब कुटुंबातील मुलगीही वैमानिक व्हावी आणि ती चंद्रपूर जिल्ह्यातील असावी, असा निश्चय केला आहे. चंद्रपूर विकासाच्या बाबतीत इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुढे आहे. मात्र, मागील दोन वर्षात जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे राहिला. त्यामुळे जे मागे राहिले ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. मुल येथे 28 तलाठी कार्यालय होत आहे. 600 कोटी रुपयांच्या एस.एन.डी.टी विद्यापीठाला मान्यता आणली व 62 कौशल्याधारीत प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी मंजूर केला आहे. मुल पोलीस स्टेशनचे डिझाईन तयार करण्यात येत असून पोलिसांचे निवासस्थान देखील उत्तम करण्यात येईल. तसेच मुल तालुक्यातील नागरिकांचे पट्टे व घरकुलांचा प्रश्न देखील निकाली काढण्यात येईल. मुल तालुका महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट असला पाहिजे, हा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

    मुल नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे लोकार्पण : 9 कोटी रुपये निधीतून 61 गाळ्याचे छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल उभारण्यात आले. यामध्ये तळ मजल्यावार 23 गाळे, पहिला व दुसरा मजला प्रत्येकी 19 गाळे, तसेच प्रसाधनगृह, जिना, लिफ्ट, स्ट्रक्चरल ग्लेझींग, अतंर्गत व बाह्य विद्युतीकरण व सोलर सिस्टीम आदी सुविधा करण्यात आल्या आहे. नगर परिषद मुल येथे वैशिष्ट्यपूर्ण निधीतून 25 लक्ष रु. खर्ची करुन मुख्य रस्त्यावरील वाल्मिकी नगरातील स्वागत गेटचे बाधंकाम करण्यात आले. तसेच नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदानातुन आठवडी बाजार व मटन मार्केटचे बांधकाम करण्यात आले. यामध्ये भाजी बाजारासाठी 45 आच्छादीत ओटे, मटन मार्केट साठी 8, चिकनसाठी  14 गाळे, फिश मार्केट स्लॉटरच्या इमारतीचे बांधकाम, पेव्हींग  ब्लॉक, पाईप नाली, सुरक्षाभिंतीचे बांधकाम करण्यात आले.आदींचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

    ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार : गिरीजाबाई मेश्राम, रामाजी मेश्राम, काशिनाथ बावनकर, महादेव कर्नेवार, अंबादास अमदूर्तीवार नागरिकांचा पालकमंत्री श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव तर आभार सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता श्री. साखरे यांनी मानले.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed