काय घडलं?
मृत अविनाश मेश्राम हे २००२मध्ये नोकरीत रूजू झाले होते. सध्या ते आयुध निर्माणी भंडारा येथे डीबीडब्ल्यू एमसीएम ग्रेड-३ या पदावर कार्यरत होते. आयुध निर्माणीच्या वसाहतीत राहणारे मेश्राम हे शनिवारी सकाळी ६ वाजता प्रथम पाळीच्या कामावर रूजू झाले. त्यावेळी एचईएक्स (आरडीएक्स) विभागाच्या सीएक्स उपविभागात २३२ बिल्डिंगमध्ये ते एकटेच काम करीत होते. या उपविभागात पीईटीएन नावाच्या उच्च स्फोटकाचा वापर सामुग्री तयार करण्यासाठी केला जातो. ही सामुग्री तयार करतानाच मोठा स्फोट होऊन मेश्राम हे गंभीर जखमी झाले. घटना घडताच प्रशासनाने अविनाश यांना निर्माणीतील रुग्णालयात दाखल केले; मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृताचे शव उत्तरीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी आयुध निर्माणीचे अधिकारी व जवाहरनगर पोलिस ठाण्यातील ठाणेदार सुधीर बोरकुटे उपस्थित होते.
चौकशी समिती गठीत
या स्फोटाच्या घटनेच्या चौकशीसाठी आयुध निर्माणी मुख्यालयीन प्रशासनाकडून त्रिस्तरीय चौकशी समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीत साहाय्यक महाप्रबंधक मल्लिक, उप महाप्रबंधक पी. व्ही. मडावी, संयुक्त कार्य व्यवस्थापक पी. के. गायधने यांचा समावेश आहे, अशी माहिती निर्माणीचे उपमहाप्रबंधक यतिश कुमार यांनी दिली. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी भेट दिली.
२००५नंतरची तिसरी घटना
रक्षा विभागासाठी स्फोटके तयार केले जाणाऱ्या भंडारा आयुध निर्माणीतील २००५नंतरची ही तिसरी मोठी घटना आहे. २००५मध्ये एन. आर. विभागात झालेल्या स्फोटात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २००८मध्ये बी. टी. विभागात झालेल्या स्फोटात पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.