• Mon. Nov 25th, 2024

    मराठा समाजाचा जल्लोष; आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य झाल्याने जिल्ह्यात फटाके फोडून आनंदोत्सव

    मराठा समाजाचा जल्लोष; आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य झाल्याने जिल्ह्यात फटाके फोडून आनंदोत्सव

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य झाल्याचा आनंदोत्सव मराठी बांधवांनी शनिवारी साजरा केला. सीबीएस येथील छत्रपती शिवाजी स्मारकात फटाके फोडून आणि पेढे वाटून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. रविवारी सकाळी ११ वाजता विजयी जल्लोष साजरा करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाद्वारे कळविण्यात आले आहे.

    मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसींमधून सरसकट आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाने लढा उभारला. जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. सरकारने मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी राज्यभरातील मराठे मुंबईच्या दिशेने निघाले. जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केल्याने सरकारने चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठविले. अखेर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करीत तसा मसुदा जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर नवी मुंबईत सुरू असलेले आंदोलन थांबविण्यात येत असल्याची घोषणा जरांगे यांनी केली. मागण्या मान्य झाल्याबद्दल राज्यभर जल्लोष सुरू झाला आहे. नाशिकमधील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुतांश बांधव जरांगे यांनी काढलेल्या मोर्चात सहभागी असल्याने ते नाशिक शहरात उपस्थित नव्हते. परंतु, छत्रपती सेनेचे अध्यक्ष चेतन शेलार यांनी मराठा बांधवांना छत्रपती शिवाजी स्मारकात जल्लोषासाठी येण्याचे आवाहन केले होते.
    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस प्राशन, मनोज जरांगे यांचं उपोषण सुटलं, मराठा आंदोलकांच्या लढ्याला यश
    चंद्रकांत बनकर, नीलेश शेलार, राजेश पवार, संदीप निगळ, बाळासाहेब भोसले, अविनाश वाळुंजे, रमेश खापरे, बापू चव्हाण, हिरामण वाघ, गौरव गाजरे, राजेंद्र देवकर आदींनी यावेळी ‘मराठा एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांना पेढे वाटून फटाके फोडण्यात आले.

    मनोज जरांगे हे मराठा समाजाचा आवाज बनले. नाशिकमध्ये नाना बच्छाव यांनी १०५ दिवस उपोषण केले. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबई गाठण्यात आली. अध्यादेशाद्वारे महत्वाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. आजचा दिवस क्रांतिकारी असून, आम्ही हा लढा जिंकला आहे.- राम खुर्दळ, प्रवक्ता, सकल मराठा समाज

    आज समस्त मराठा समाजाचा विजय झाला आहे. मराठा क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील, अण्णासाहेब येरळीकर, प्रा. देवीदास वडजे, कै. आमदार विनायक मेटे यांसह शेकडो समाजबांधवांनी मराठा आरक्षणासाठी जे बलिदान दिले, त्याचे हे यश आहे. मनोज जरांगे यांच्या प्रामाणिक संघर्षामुळे हे शक्य झाले आहे.- करण गायकर, छावा क्रांतिवीर संघटना

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed