• Mon. Nov 25th, 2024
    गुलाल उधळायला ही काय निवडणूक होती का? गुणरत्न सदावर्ते यांचा मनोज जरांगेंना सवाल

    मुंबई : मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडलं. यानंतर नवी मुंबईतील वाशी येथे मराठा आंदोलकांनी जल्लोष केला. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याशिवाय गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा युवकांनी शांततेत घरी जावं. घरी गेल्यानंतर मराठा युवकांनी पुस्तकांचं वाचन करावं, वाचाल तर वाचाल असं म्हटलं.

    गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

    महाराष्ट्रात माझ्यावर एक जबाबदारी आहे, खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, जैन, वैश्य आणि मागासवर्गातील गुणवंत असतील त्यांच्या जागा शाबूत ठेवणे, त्यांच्या अधिकारावर गदा येऊ न देणे ही माझ्यावर जबाबदारी आहे. मागासप्रवर्गातील माझे लोहार, वडार, सुतार, नाभिक भाऊ असेल यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याचं, त्यांच्या जागा टिकवण्याची जबाबारी माझ्यावर आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची संरक्षणाची जबाबदारी जयश्री पाटील आणि माझी आहे, असं सदावर्ते म्हणाले.

    मराठा समाजाचे जे भाऊ आहेत त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आंदोलनाचा आहे, असं सदावर्ते म्हणाले. आज जर जे नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटीस आहे. ते पाहून उच्च न्यायालयात जाणार आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं.

    माझ्या सामान्य मराठा भावांना, माझ्या कष्टकरी मराठा भावांनी कायद्याचं वाचन करावं, त्यानंतर त्यांना स्पष्टपणे समजेल की काय परिस्थिती आहे. जे बोलले गेलं की सगेसोयरे यांच्याबाबत ते कायद्यात अतंर्भूत आहेत. कायद्यात असलेल्या गोष्टींवर वेळेचा अपव्यय, मनुष्यबळाचं झालेलं नुकसान महत्त्वाचं आहे. कुणीपण या गोष्टीला विजयोत्सव म्हणून नये. आरक्षण जय पराजय यावर नसतं. मी तुरुंगात १७ दिवस उपोषण केलं आहे. खासगी डॉक्टरांकडून तपासणी करुन काही लोक तब्येतीची माहिती सांगतात, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंं.

    कोणतीही बॅकडोअर किंवा फ्रंट डोअर एंट्री कायद्यात नाही. कायद्यात पडताळणी नावाचा प्रकार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे, की मराठवाड्यातील कुणबी हे मागास नाहीत, असं सदावर्ते म्हणाले. सरकार असो की मनोज जरांगे असो कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही, असं सदावर्ते म्हणाले.

    मनोज जरांगे पाटील यांचं ज्ञान काय आहे हे माहिती नाही. जरांगे पाटील कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेले आहेत? कोणत्या विषयात डॉक्टरेट केलेली आहे, कोणची याचिका केलेली आहे. मराठा समाजातील विद्वान माणसांनी बोललं तर समजू शकतो, असं सदावर्ते म्हणाले.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *