• Sat. Jan 4th, 2025

    पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

    ByMH LIVE NEWS

    Jan 26, 2024
    पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे दि. २६ : जिल्ह्यातील शेती, उद्योग, व्यापार, रोजगार, स्वयंरोजगार, पर्यटन, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासोबतच पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

    भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित समारंभात ते बोलत होते.

    उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणे जिल्हा हा वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील रस्ते, मेट्रो मार्ग, रेल्वे मार्गाद्वारे विकासाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांनी या कामांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    पुणे शहर शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जात असल्याचे नमूद करून श्री.पवार म्हणाले, जिल्ह्यातील गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळ, अष्टविनायक, तीर्थक्षेत्र, राष्ट्रपुरुषांची स्मारके आदींच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. भिडेवाडा येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती प्रदर्शित करणारे प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    जिल्ह्याच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगून श्री.पवार म्हणाले, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यात येत आहे. राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ सुरू केल्याने शेतकरी कुटुंबांना १२ हजार रुपये वार्षिक लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील वीज उपकेंद्र आणि वीज वाहिन्यांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा ९४८ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा राज्य समितीकडे सादर करण्यात आला असून ४०० कोटींची अतिरिक्त मागणीही करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

    स्वच्छ भारत अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी;नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन

    राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये पुणे जिल्ह्याने सलग दुसऱ्यांदा देशपातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याचे नमूद करून श्री. पवार म्हणाले, जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. नागरिकांनी या कामगिरीत सातत्य ठेवत शहर आणि जिल्हा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. एक जबाबदार नागरिक म्हणून राज्याच्या प्रगतीत प्रत्येक व्यक्तीचं योगदान महत्वाचे असून त्यासाठी सर्वांनी यापुढच्या काळात अधिक सक्रीय भूमिका बजावावी. देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावा असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed