• Sat. Sep 21st, 2024
येरवड्यात नवे ‘आयटीआय’; जिल्हा नियोजन समितीतून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी

पुणे : दहावी- बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी आता येरवड्यातही औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. वाघोली येथील जागेतही ‘आयटीआय’ची स्वतंत्र इमारत बांधली जाणार असून, दोन्ही ठिकाणी आठ ते नऊ प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत. सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना ‘आयटीआय’चे शिक्षण मिळणार आहे. पुणे शहरात आता सुमारे पाच ‘आय़टीआय’ संस्था कार्यरत होणार आहेत.

पुण्यात पाच ‘आयटीआय’

सध्या पुण्यात औंध येथे दोन, पिंपरी-चिंचवड अशा तीन ‘आयटीआय’ संस्था कार्यरत आहेत. त्याशिवाय पेरणे फाटा (ता. हवेली) येथे असलेल्या ‘आयटीआय’ची संस्था सध्या भाड्याच्या जागेत गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. पुण्यात आणखी एक ‘आयआटीआय’ संस्था असावी, असा प्रस्ताव चर्चेतून पुढे आला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे ठरविले. भाड्याच्या जागेतील पेरणे फाटा (ता. हवेली) येथील संस्थेसाठी स्वतंत्र जागा देण्याचे निश्चित केले. पुढील शैक्षणिक वर्षात दोन ‘आयटीआय’ संस्था सुरू होणार असून, पुण्यात आता पाच ‘आयटीआय’ संस्था असतील.

येरवड्यातही नवे ‘आयटीआय’

येरवडा येथील लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावर सुमारे पाच एकर सरकारी जागेत येरवड्यातील नवे ‘आयटीआय’चे केंद्र सुरू करण्याची आमदार सुनील टिंगरे यांची मागणी होती. त्यानुसार अजित पवार यांनी त्याला मान्यता देऊन जिल्हा नियोजन समितीच्या २०२३-२४ या वर्षाच्या निधीतून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ‘आयटीआय’च्या इमारतीसाठी बांधकाम सुरू होणार आहे. या संस्थेत इलेक्ट्रिशियन, वेल्डर, कम्प्युटर प्रोग्रामर आणि ऑपरेटिंग अॅनालिसिस (कोपा), मेकॅनिक मोटार, मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटिंग, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, फिटर, टीडीएम हे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १८ बॅचेस घेण्यात येणार आहेत. संस्थेत सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना पुढील वर्षी प्रवेश देण्यात येणार आहे.

वाघोलीत तीन एकर जागेत संस्था

पेरणे फाटा येथे २००८मध्ये ‘आयटीआय’ सुरू करण्यात आले होते. सध्या भाड्याच्या जागेत संस्था आहे. संस्थेला स्वतःची स्वतंत्र जागा असावी, अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केल्याने वाघोली येथील वाघजाई मंदिराच्या परिसरात सुमारे तीन एकर जागा दिली आहे. ही संस्था ‘हवेली आयटीआय’ संस्था म्हणून ओळखली जाते. येथे मोटर मेकॅनिक, मशिनिस्ट, पेंटर, इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम मॅनेजमेंट (आयसीटीएसएम), कम्प्युटर प्रोग्रामर आणि ऑपरेटिंग अॅनालिसिस (कोपा), फॅशन टेक्नॉलॉजी, कॉस्मोटोलॉजी, इलेक्ट्रिशियन असे आठ विषय शिकविले जाणार आहेत. जिल्हा नियोजन समितीतून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याच्या इमारतीचे काम लवकरच सुरू होईल, असे सांगण्यात आले.

अभियांत्रिकीच्या धर्तीवर इमारत

वाघोली, येरवडा येथील ‘आयटीआय’ संस्थांच्या कार्यशाळांच्या इमारती आता अभियांत्रिकी संस्थांच्या इमारतीच्या धर्तीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात येणार आहे. वास्तुविशारदामार्फत त्याची रचनाही निश्चित केली आहे. या ठिकाणी प्राचार्यांची कार्यालये, कार्यशाळांची इमारत, स्वच्छतागृहे आदींची सुविधा येथे आहे, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीच्या २०२३-२४ या वर्षाच्या निधीतून वाघोली आणि येरवडा येथील ‘आयटीआय’च्या प्रशिक्षण व कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी निधी देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या ‘आय़टीआय’ला प्रत्येकी सुमारे १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. -डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

पेरणे फाट्यातील संस्थेला आता वाघोली येथे जागा मिळाली आहे. निधी मंजूर झाल्याने लवकरच या संस्थेच्या इमारतीचे काम सुरू होईल. येरवड्यातही नव्याने ‘आयटीआय’ संस्था सुरू होणार असून, त्यामुळे आता पुणे शहरात पाच संस्था सुरू होणार आहेत.- संतोष गोसावी, प्राचार्य, आयटीआय, वाघोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed