• Sat. Sep 21st, 2024
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा मराठवाडा राममय, लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह

म. टा. प्रतिनिधी, लातूर: अयोध्येत आज, सोमवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लातूरमध्ये रविवारी मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आबालवृद्ध नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामभक्तांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध संस्था, संघटना, मंडळांचे कार्यकर्ते या कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहाने आयोजन करीत आहेत. व्यापारी वर्गाचा उत्साहही वाखणण्याजोगा आहे. गांधी चौक, हनुमान चौक, सराफ लाइन, गंजगोलाई, विवेकानंद चौक, ठाकरे चौक, छत्रपती शिवाजी चौकातील व्यापाऱ्यांनी समोरच्या दर्शनी भागातील रस्त्यावर ही विद्युत रोषणाई केली आहे.

राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी! श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्येत दिवाळी, रामरंगात रंगले शहरवासी

शहराच्या विविध भागांत रविवारीच रामरथाच्या मिरवणुकीचे आयोजन केले आहे. महिला, तरुणांचा उत्साह दिसून येत आहे. लातुरातील पुरातन श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम होत आहेत. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सूरतशहावली दर्गाला चादर अर्पण करून त्यांच्या परिसरात सुरुवात केली आहे.

लातुरातील जुना औसा रोड भागातील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी एकत्र येत मिरवणूक काढली आहे. या यात्रेत मंदिर विश्‍वस्त इंद्रजित ठाकूर, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नगरसेवक शोभा पाटील, व्यंकटेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती आहे. या यात्रेत भजनीमंडळ, भगवे वस्त्र परिधान केलेल्या महिला, तरुणांचा मोठा सहभाग आहे. परिसरातील सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर, ओंकार हनुमान मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात येणार असून, अयोध्या कॉलनीतील श्रीराम मंदिरात त्याचा समारोप होणार आहे.

श्री केशव मित्र मंडळच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. केशवनगरमधील वीर हनुमान मंदिर येथून निघालेली ही मिरवणूक केशवनगर, अंबा हनुमान, कॉकसिट कॉलेज, शारदा कॉलनी, बँक कॉलनी, केशवनगर, इंडियानगर या भागातून काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. नागरिकांनी जागोजागी यात्रेचे फटाके वाजवून स्वागत केले. सडा, रांगोळ्या, भगव्या पताका, श्रीराम मूर्तीचे भव्य फलक यांनी रस्ते सजले होते. मिरवणुकीत रामरथावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान रूपात मुले विराजमान झाली होती. भव्य श्रीराम प्रतिमा वेगळ्या रथावर लावण्यात आली होती. मिरवणुकीत उंट, घोडे सजलेल्या स्वारासहित सहभागी झाले. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी केशव मित्र मंडळाचे अध्यक्ष सर्वोत्तम कुलकर्णी, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगरसेविका सपना किसवे, कीर्ती धूत, विलास आराध्ये, मुरलीधर दीक्षित, किशोर कुलकर्णी, कांचन भावठाणकर, संजय निरगुडे, पोटे, अजय सूळ, अजय रेणापूरे आदींनी परिश्रम घेतले.

डोंबिवलीत विश्वविक्रमी दीपोत्सव; १ लाख ११ हजार १११ दिव्यांनी साकारली श्रीरामाची प्रतिमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed