एखादे विमान विमानतळावर कोसळले, तर विमानातील प्रवाशांना कसे वाचवावे, यासाठी हे प्रात्यक्षिक होते. मिहान इंडियाच्यावतीने नागपूर विमानतळ प्रशासन बचाव पथक, विमानतळ अग्निशमन दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि नागपूर अग्निशमन दल यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विमानतळ परिसरात हा सराव करण्यात आला. ‘डीजीसीए’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आपत्कालीन स्थितीत यंत्रणा सज्ज आहे की नाही, हे तपासण्यासाठी मॉकड्रिल घेण्यात येते. यावेळी प्रभारी वरिष्ठ विमानतळ संचालक तसेच एमआयएलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सूरज शिंदे, एमआयएलचे सहमहाव्यवस्थापक (ऑपरेशन्स आणि सेफ्टी) लक्ष्मीनारायण भट, विभागप्रमुख (एआरएफएफ आणि एमटी) प्रमोद इंगोले यांच्यासह एटीसी, एओसीसी, टर्मिनल मॅनेजमेंट, सीआयएसएफ, एमएडीसी अग्निशमन सेवा, एअर इंडिया एअरलाइन्स, इंडिगो एअरलाइन्स, शहर अग्निशनम सेवा, स्टार एअर, कतार एअरवेज, शहर पोलिस, एनडीआरएफ, एसडीआरएफ, किम्स-किंग्ज्वे हॉस्पिटल, ऑरिअस हॉस्पिटल, एम्सचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
अन् सर्व सुखरूप बचावले
विमान धावपट्टीवर कोसळल्यानंतर पेट घेते, अशा स्थितीत बचाव कसा करायचा, याचा सराव यावेळी करण्यात आला. आग लागल्यानंतर ती कशी विझवायची, याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर झाले. अग्निशमनने टेंडर फोम टाकून आग विझविली. त्यानंतर विमानतळ रुग्णवाहिकेच्या मदतीने प्रवाशांना रुग्णालयात पोहचविण्यात आले. विमानतळाकडून नागपूर अग्निशमन दलाला सूचना देऊन दोन अग्निशमन गाड्या विमानतळ परिसरात बोलविण्यात आल्या. सुखरूप सर्वांना बाहेर काढले, बचाव अभियान यशस्वी पार पडल्याचा आनंदही यावेळी साजरा करण्यात आला. मॉकड्रिल असले तरी प्रत्यक्ष वाटावे, असा सराव यावेळी करण्यात आला.