• Mon. Nov 25th, 2024

    धान्याची अफरातफर थांबणार, रेशन दुकानातील साठा ‘ई पॉस’शी जुळणार; कधीपासून होणार सुरुवात?

    धान्याची अफरातफर थांबणार, रेशन दुकानातील साठा ‘ई पॉस’शी जुळणार; कधीपासून होणार सुरुवात?

    पुणे : रेशन दुकानात पाठविलेला धान्यसाठा काही कारणांस्तव वितरित केल्यानंतरही शिल्लक राहतो. विक्रेत्यांकडूनही ‘ई पॉस’वर शिल्लक साठा प्रत्येक वेळी नोंदविला जातोच असे नाही. मात्र, आता रेशन दुकानांच्या पातळीवरील धान्यांचा काळाबाजार रोखला जाणार आहे. त्यासाठी दुकानातील साठ्याइतकीच नोंद ‘ई पॉस’वर केली जाणार आहे. त्यामुळे ‘ई पॉस’ मशिनसह दुकानातील धान्याचा साठा जुळण्यास मदत होणार आहे. फेब्रुवारीपासून याची सुरुवात होणार आहे.

    अन्न व नागरी पुरवठा विभागाला ‘ई पॉस’मध्ये दुरुस्ती करण्याची राज्यातील अनेक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मागणी केली होती. त्याची दखल घेण्यात आली आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेऊन ‘ई पॉस’वर साठा अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. रेशन विक्रेत्यांना गेल्या काही वर्षांपासून धान्यांत काळाबाजार करण्याची संधी मिळत होती. स्वस्त धान्य दुकानातील हजारो किलो धान्य बाजारात खुलेआम विक्री होताना अनेकदा आढळले होते. त्यामुळे विक्रेत्याला ‘मलिदा’ मिळत असला, तरी प्रत्यक्षात लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येत होती.

    VIDEO | फ्लाईट रखडल्याचा राग, इंडिगोच्या पायलटला प्रवाशाचा विमानातच ठोसा, काय घडलं?
    ‘ई पॉस’वर साठा नोंदविणार

    ‘ई पॉस’ मशिनवर दिसणारा आणि दुकानातील प्रत्यक्षातील धान्य साठा आता जुळवावा लागणार आहे. त्यामुळे धान्य विक्रेत्याचा कस लागणार असून, कोणतीही लपवाछपवी करता येणार नाही. त्यामुळे काळाबाजार रोखता येणार आहे. दुकानातील प्रत्यक्ष साठा ‘ई पॉस’ मशिनवर ऑनलाइन नोंदविला जाईल. त्यामुळे धान्यखरेदी केलेल्या लाभार्थ्यांची नोंद ‘ई पॉस’ मशिनवर झाल्यानंतर एकूण धान्यातून विक्री केलेले धान्य आपोआप वजा होईल. त्यामुळे ‘ई पॉस’ आणि दुकानातील शिल्लक धान्य साठा जुळण्यास मदत होणार आहे.

    धान्याची अफरातफर थांबणार

    ‘ई पॉस’ मशिन सध्या पूर्णपणे आधार कार्डशी जोडण्यात आले आहे. लाभार्थ्यांचा अंगठा ‘ई पॉस’वर लावल्याशिवाय त्याला धान्य मिळत नाही. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यासह धान्य विक्रेत्यासाठी हे मशिन शोभेची वस्तू झाले होते. मशिन आणि दुकानातील धान्यसाठा कोणीही तपासत नव्हते. त्यामुळे कर्मचारी, विक्रेत्यांच्या ‘कारभारा’मुळे धान्याला पाय फुटत होते. आतापर्यंत ऑनलाइनद्वारे धान्यसाठा अद्ययावत करण्याचे धोरण आखले गेले नव्हते. हे धोरण आखल्याने एखाद्या दुकानात काही प्रमाणात धान्य शिल्लक असेल, तर पुढील महिन्यात लागणाऱ्या एकूण धान्याच्या तुलनेत शिल्लक साठा वजा करून उर्वरित धान्य दिले जाणार आहे. त्यामुळे दुकानात शिल्लक धान्य संबंधित लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे धान्याची अफरातफर थांबेल, असा विश्वास अन्न नागरी पुरवठा विभागातील सूत्रांनी व्यक्त केला.

    ‘ई पॉस’ मशिनवर ऑनलाइन धान्य जुळविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. फेब्रुवारीपासून दुकानातील प्रत्यक्ष साठा आणि मशिनवरील धान्याची जुळवाजुळव करण्यास सुरुवात होईल. आतापर्यंत विक्रेत्यांनी ऑनलाइन नोंद न केल्यास किंवा तांत्रिक कारणास्तवत धान्य दिल्याची नोंद न झाल्याने धान्याचा साठा जुळत नव्हता. मात्र, आता तो जुळण्यास मदत होईल.

    – डॉ. सीमा होळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

    मेरी झांसी नही दूँगी! संजयभाऊ, तुम्ही लोकसभा लढलात तर मी तुमच्या विधानसभा मतदारसंघातून लढेन: भावना गवळी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *