• Sat. Sep 21st, 2024
शरद मोहोळनंतर आणखी एका सराईत गुंडांची हत्या, पहाटे वार करत संपवंल; २५ गुन्हे होते दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे : कॅम्प भागात एका टोळक्याने सराईत गुंडावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली. पसार झालेल्या टोळक्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अरबाज ऊर्फ बबन शेख (वय ३५, रा. चुडामन तालीम, भवानी पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पहाटे हत्याराने वार

कॅम्प परिसरातील ताबूत स्ट्रीट परिसरात खाऊगल्ली आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास तेथे मारामारी सुरू असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा एकावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते; तसेच त्याच्या डोक्यात दगड मारण्यात आला होता. शेखला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

‘गरिबी’वर पडदा! PM मोदींच्या दौऱ्यात दिसणारी घरं कपड्यानंं झाकली; यंत्रणेचा असंवेदनशील प्रताप
आरोपींचा शोध सुरू

पोलिसांनी ताबूत स्ट्रीट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक प्रियांका शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली.

दहा दिवसांपूर्वीच झाली सुटका

शेखविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, मारहाण, विनयभंग असे सुमारे २५ गुन्हे दाखल आहेत. त्याची कॅम्प भागात परिसरात दहशत होती. पोलिस आयुक्तांनी शेखविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाईदेखील केली होती. तो वर्षभर कारागृहात स्थानबद्ध होता. दहा दिवसांपूर्वीच त्याची कारागृहातून सुटका झाली होती.

कात्रज भाजी मंडईत एकाचा खून

कात्रज येथील भाजी मंडई परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मनोहर बागल (वय ५५, रा. शिवशंभोनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे.

भाजी मंडई परिसरात एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, तेथे एक पिशवी सापडली. पिशवीतील कागदपत्रांवरून मृत व्यक्तीची ओळख पटली. पोलिसांनी बागल यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला, तेव्हा ते कात्रज परिसरात एकटेच राहत असल्याची माहिती मिळाली. खुनामागचे कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

‘रामरज’ म्हणजे नेमकं काय? राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पाहुण्यांना मिळणार खास गिफ्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed