बीडमध्ये ‘ओबीसी एल्गार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भुजबळ बोलत होते. या वेळी आमदार गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, टी. पी. मुंडे, केशव आंधळे, लक्ष्मण गायकवाड, समीर भुजबळ उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही; पण अजून आम्हाला आमचा वाटा मिळलेल नाही. बंधुभाव ,समता ही आपली परंपरा होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सगळ्या समाजाचे लोक होते. बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबाचे घर जाळण्यात आले. तरीही आमदार संदीप क्षीरसागर मनोज जरांगे यांना भेटायला गेले. सुभाष राऊत यांचे हॉटेल जाळल्यानंतर आम्ही ओबीसी संघटन करण्यास सुरुवात केली. आज गोपीनाथ मुंडे असते तर हे सर्व प्रश्न उभे राहिले नसते. मुंडे आज आपल्यात नाहीत आणि ओबीसींना संकटांच्या मालिकेस तोंड द्यावे लागते आहे. अनेक जण आमच्या विरोधकांना आर्थिक, गाड्यांची मदत देत आहेत; पण त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ.’
‘ओबीसीला धक्का नको’
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळणार नाही, असा पुनरुच्चार भुजबळ यांनी केला. ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत चार आयोग आले, त्यांनी सामाजिकदृष्ट्या मागास असे म्हणून आरक्षण देण्याचे फेटाळले. सर्वोच्च न्यायालयानेही आरक्षण नाकारले आहे. आताच्या पहिल्या आयोगाने घाबरून राजीनामे दिले. मागास आयोग आहे की मराठा आयोग, हेच कळत नाही. तुम्ही आमचे आरक्षण मागू लागलात, तर त्यांच्याविरोधात आम्ही उभे टाकणार. मराठा नेते, सरकारला आम्हाला सांगायचे आहे की, तुम्हाला आरक्षण देण्यास विरोध नाही पण आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. सरकारकडून ही त्यांच्यासाठी लाखो रुपये देऊन सूत्र हलवली जाते. आमची ओबीसीची केस उभी आहे, त्याचीही काळजी घ्या. मला कोणतेही पद नको, फक्त आरक्षण वाचवणे हे आमचं काम आहे.’
मराठा नेत्यांना, समाजाला माझी विनंती की आंदोलन करण्याचा हक्क सर्वांना आहे; मात्र गावबंदी चूक आहे. लोकांना व सरकारला वेठीस धरणे चूक आहे. मुंबईत चार कोटी जणांना घेऊन येईन, असा दबाव निर्माण करणे चूक आहे. घरे पेटवणे चूक आहे. आज ओबीसी संकटात आहेत. सर्वांनी एकमेकांचे आरक्षण टिकवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
– छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री