• Mon. Nov 25th, 2024

    वाळू माफियांची मुजोरी, कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न; दगडफेक करत मारहाण

    वाळू माफियांची मुजोरी, कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न; दगडफेक करत मारहाण

    जळगाव : जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांची मुजोरी आता शासकीय अधिकार्‍यांना जीवे मारण्यापर्यंत वाढली आहे. एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना जमिनीवर पाडून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी मध्यरात्री घडली. यावेळी वाळूमाफियांनी पथकावर दगडफेकही केली. याप्रकरणी कासोदा येथील पोलीस ठाण्यात मुख्य संशयितासह १० ते १२ अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाणपासून अवघ्या १७ कि.मी. अंतरावर उत्राण येथील गिरणा नदीपात्रात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजता एरंडोल उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी, भालगावचे मंडळ अधिकारी दीपक ठोंबरे, तलाठी शेख शकील, निपाणीचे तलाठी विश्वभंर शिरसाठ, पोलीस पाटील प्रदीप तिवारी यांचे पथक वाळूमाफियांवर कारवाईसाठी गेले होते.

    राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना तंबी, ‘कारसेवकां’साठी चांगले उपक्रम राबवा
    वाळूमाफियांकडून अधिकाऱ्यांवर हल्ला

    नदी पात्रात ८ ते १० ट्रॅक्टर अवैधपणे वाळू भरत असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाला पाहताच चालकांनी ट्रॅक्टर भरधाव घेत पलायन केले. मात्र, तेथे दोन ट्रॅक्टर थांबले होते. पथकाने पकडताच आणखी चार-पाच जण आले. अधिकाऱ्यांनी त्यांना सरकारी कामात अडथळा आणू नका, असे बजावले त्यावेळी ट्रॅक्टर चालक आकाश राजेंद्र पाटील, अमोल, राहुल, दादाभाऊ, सागर (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यासह १०-१२ जणांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत हल्ला केला.

    पथकातील अधिकाऱ्यांना पकडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपविभागीय अधिकारी गायकवाड यांना खाली जमिनीवर पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गायकवाड यांची प्रमोद गायधनी, दीपक ठोंबरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वाळूमाफियांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर संशयितांनी दगडफेक केल्याने गायकवाड, गायधनी, ठोंबरे यांच्यासह कर्मचारी जखमी झाले.

    मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आणि वास्तू शांतीच्या दिवशी…एकनाथ शिंदेंसाठी प्रसाद ओकची खास पोस्ट
    अधिकारी जखमी; गायकवाड बचावले

    दगडफेकीत गायकवाड यांचा डोळा थोडक्यात बचावला. गायधनी यांच्या हाताला, कंबरेवर मुका मार लागला आहे. त्यांच्यावर एरंडोल येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. उत्राणचे मंडळ अधिकारी गायधनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा येथील पोलीस ठाण्यात मुख्य संशयित आकाश पाटील याच्यासह १० ते १२ मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख व पथकाने भेट देत जखमी अधिकाऱ्यांची विचारपूस केली.

    जय श्रीराम लिहून रिक्षाच बनवली, रिक्षाचालक थेट अयोध्येला निघाला

    अधिकाऱ्यांवर दगडफेक

    आमच्या अंगावर बसून मारेकऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आम्हीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मारेकऱ्यांचे संख्याबळ अधिक असल्यामुळे आम्ही पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी केलेल्या दगडफेकीत आम्ही सर्वच जखमी झालो. एरंडोल शासकीय रुग्णालयात उपचार केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना घटनेची माहिती देत, पथकांना हत्यारे देण्याची मागणी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *