शहरातील गुरुकृपा कॉलनी येथील रहिवासी प्रतीक गजाननराव चिकटे (३०) याच्यासोबत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संपर्क साधला आणि त्याला फेक मेसेज पाठवून ऑनलाइन हॉटेल बुकिंगच्या पार्ट टाइम नोकरीचं आमिष दाखवलं. या कामासाठी चांगले पैसे मिळतील असंही त्याला सांगण्यात आलं.
सुरुवातीला प्रतीक यांना या नोकरीतून फायदा झाला. पण त्यानंतर ते चोरट्यांच्या जाळ्यात अडकले. वेगवेगळी कारणं सांगून त्याला ऑनलाइन रक्कम पाठवण्यास भाग पाडण्यात आलं. अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्यांनी त्याची १३ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत तब्बल १० लाख ३८ हजार ७४४ रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी तरुणाने सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
आणखी एका व्यावसायिकाची फसवणूक
दुसऱ्या एका घटनेत तरुण व्यावसायिकाची ४ लाख ३४ हजार ७१६ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. शहरातील शिवकृपा कॉलनी येथील रहिवासी कापड व्यावसायिक हितेश संजय नानवाणी (२८) याच्यासोबत सायबर गुन्हेगाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्क साधला. ब्राईट ऑप्शन कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी त्याला वेगवेगळ्या खात्यांमध्ये ४ लाख ३४ हजार ७१६ रुपये जमा करण्यास भाग पाडलं. १ जून ते २९ डिसेंबर २०२३ दरम्यान हा प्रकार घडला. पैसे भरूनही नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर हितेश यांनी सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली.