• Mon. Nov 25th, 2024

    पक्षफुटीनंतर जावई पहिल्यांदाच सासुरवाडीत, डोंबिवलीत बॅनरबाजी, कुटुंबप्रमुख असा उल्लेख

    पक्षफुटीनंतर जावई पहिल्यांदाच सासुरवाडीत, डोंबिवलीत बॅनरबाजी, कुटुंबप्रमुख असा उल्लेख

    डोंबिवली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला. या निकालानंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली सासुरवाडी डोंबिवली येथे येणार आहेत. उद्धव ठाकरे हे संपर्क दौऱ्यानिमित कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात शनिवारी येत आहेत. त्यानिमित्ताने डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शिवसेना ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. डोंबिवलीमधील बॅनरवर उद्धव यांचा कुटुंब प्रमुख म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे हे प्रथमच डोंबिवली दौऱ्यावर येत असून ते येथे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा संपर्कदौरा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने गुरुवारी रात्रीपासून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.

    शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख ठाकरे हे ठाणे येथे येऊन गेले होते. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. शिवाय शिवसेनेचा बालेकिल्ला देखील आहे. या लोकसभा मतदारसंघासाठी एकीकडे भाजप प्रयत्न करत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाकडून हा लोकसभा मतदारसंघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे.

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही शिंदे यांचीच असा निकाल दिला असून शिंदे व ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरविले आहे. या निकालानंतर प्रथमच ठाकरे हे कल्याणमध्ये येत असून कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचा ते आढावा घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांचा हा संपर्क दौरा शिवसैनिकांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात हे पहावे लागेल. ठाकरे यांची तोफ मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. शिंदे यांच्या मतदार संघात धडाडणार असून ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    डोंबिवली ठाकरे यांची सासुरवाडी

    उद्धव ठाकरे याची सासुरवाडी डोंबिवली असून रश्मी ठाकरे पूर्वी डोंबिवलीत राहायच्या. बाळासाहेब सुद्धा पूर्वी रश्मी यांच्या माहेर घरी म्हणजे पेंडसेनगर येथील बंगल्यात यायचे. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच डोंबिवली येतं असल्याने कार्यकर्ते उत्साही झाले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *