• Mon. Nov 25th, 2024

    स्वच्छतेत पुन्हा घसरगुंडी; रँकिंगमध्ये नागपूर ८६व्या क्रमांकावर; महापालिकेचे दावे सतत ठरतायत फोल

    स्वच्छतेत पुन्हा घसरगुंडी; रँकिंगमध्ये नागपूर ८६व्या क्रमांकावर; महापालिकेचे दावे सतत ठरतायत फोल

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : शहर स्वच्छतेबद्दल अनेक उपक्रम राबवण्याचे नागपूर महापालिकेचे दावे पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरची अलीकडच्या काही वर्षांत सुरू असलेली घसरण कायम आहे. गुरुवारी स्वच्छ सर्वेक्षण २०२३चा निकाल आला. त्यात शहर ८६व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. गेल्यावर्षी हा क्रमांक २२वा होता. शहराला कचरामुक्त करण्यात महापालिकेला पुरते अपयश आले असून या गटात शून्य गुण मिळाले आहेत.

    केंद्र सरकारच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३चे निकाल जाहीर करण्यात आले. यात एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४४६ शहरांच्या यादीत नागपूरला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान, दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या कामगिरीत नागपूरने २७वा क्रमांक राखला आहे. यंदाच्या सर्वेक्षणात एकूण ९ हजार ५०० गुणांची विभागणी करण्यात आली होती. यामध्ये सेवेची गुणवत्ता, सर्टिफिकेशन आणि नागरिकांचे मत अशा तीन विभागांतील कामगिरीवर गुण देण्यात आले. महापालिकेने सेवेच्या गुणवत्तेत ५१ टक्के, तर नागरिकांचे मत या विभागात २६ टक्के आणि विविध प्रमाणपत्र मिळवण्यात २३ टक्के गुण मिळवले आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करत असल्याबद्दल महापालिकेला ओडीएफ आणि वॉटर प्लस हे सर्टिफिकेशन मिळवण्यात यश आले आहे. या विभागात २ हजार ५००पैकी १,१२५ गुण शहराने मिळवले आहेत.
    ‘स्वच्छ सर्वेक्षणा’त पिंपरी दुसरे; कचरामुक्त शहरासाठी प्रथमच ‘वॉटर प्लस’ पुरस्काराने गौरव
    दरम्यान, कचरामुक्त शहर करण्यात सलग दुसऱ्या वर्षी महापालिकेला अपयश आले असून या विभागात शून्य गुण मिळाले आहेत. शहराला कचरामुक्त ठेवण्यासाठी महापालिकेकडून घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी दोन खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. इतकेच नव्हे, तर स्वच्छ सर्वेक्षणातील कामगिरी कशी सुधारता येईल, यासाठी आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या केपीएमजी या खासगी कंपनीची सेवाही महापालिकेकडून घेण्यात येते. यासाठी कंपनीला दर महिन्याला दहा लाख रुपयांचे शुल्क अदा करण्यात येते. असे असताना महापालिकेला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.

    स्वच्छ रँकिंगमध्ये घसरण झाली असताना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून एकूण गुणांपैकी ६ हजार १६३.८० गुण म्हणजे ६४.८८ टक्के मिळाले असून कामगिरीत सुधारणा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. महापालिकेच्या स्वच्छ अभियानाचे अॅम्बेसेडर कौस्तव चॅटर्जी म्हणाले, ‘घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात अपयशी ठरल्याने साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भांडेवाडी येथे यासाठी प्रक्रिया केंद्राची उभारणी सुरू असून येणाऱ्या काळात हे केंद्र सुरू होईल. त्यानंतर नक्कीच शहराच्या रँकिंगमध्येही फरक पडेल, अशी आशा आहे.’

    उपराजधानीची आतापर्यंतची कामगिरी (वर्ष आणि रँकिंग’

    २०१७ : १३७
    २०१८ : ५५
    २०१९ : ५८
    २०२० : १८
    २०२१ : २३
    २०२२ : २७
    २०२३ : ८६

    असे मिळाले गुण

    -सेवेची गुणवत्ता : ४,८३०पैकी ३,२६०.६६
    -कचरामुक्त शहर : १२५०पैकी शून्य
    -ओडीएफ आणि वॉटर प्लस : १२५०पैकी ११२५
    -नागरिकांचे मत : २,१७०पैकी १,७७८.१४

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed