माजी आमदार मोहन जोशी, सध्याचे आमदार रवींद्र धंगेकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, बाळासाहेब शिवकर, अनंत गाडगीळ, माजी उपमहापौर आबा बागूल, दत्ता बहिरट, गोपाळ तिवारी, संगीता तिवारी, नरेंद्र व्यवहारे, यशराज पारखी, मुकेश धिवार, राजू कांबळे, मनोज पवार, संग्राम खोपडे आणि दिग्विजय जेधे यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
शहर काँग्रेसकडून हे सर्व अर्ज प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येणार आहेत. प्रदेश काँग्रेसकडून या अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर सर्व अर्ज राष्ट्रीय काँग्रेसकडे पाठविण्यात येतील. उमेदवारीचा निर्णय दिल्लीतच होणार असल्याने प्रमुख इच्छुकांना उमेदवारी मिळविण्यासाठी दिल्लीतच ‘लॉबिंग’ करावे लागणार आहे.
पुणे लोकसभेच्या निरीक्षकपदी माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कदम यांनी २०१४ची लोकसभा निवडणूक पुण्यात लढवली असून, पुण्यातील काँग्रेसच्या नेत्यांमधील हेवेदावे, रुसवेफुगवे यांची त्यांना चांगलीच माहिती आहे. या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
जोशी समर्थक सर्वाधिक
माजी आमदार मोहन जोशी यांच्या समर्थकांची संख्या इच्छुकांमध्ये सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेससह दिल्लीश्वरांपुढे आपल्या समर्थकांची ताकद दाखविण्याचा जोशी यांचा हा प्रयत्न असेल. ऐन वेळी या इच्छुकांकडून जोशी यांच्या उमेदवारीची आग्रही मागणी होईल. शेवटच्या क्षणी जोशी, अरविंद शिंदे आणि आमदार रवींद्र धंगेकर उमेदवारीच्या शर्यतीत प्रामुख्याने असतील, अशी प्रतिक्रिया उच्चपदस्थ नेत्याने व्यक्त केली.
दावे-प्रतिदावे
माजी आमदार मोहन जोशी यांनी २०१९ची लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे यंदाही निवडणूक लढविण्याबाबत ते आग्रही आहेत. जोशी यांचे समर्थक समजले जाणारे आमदार रवींद्र धंगेकरसुद्धा इच्छुकांच्या स्पर्धेत असल्याचे बोलले जाते. जोशींना उमेदवारी मिळत असेल, तर धंगेकर काय भूमिका घेतील, यावरही काँग्रेसमध्ये तर्क लढविले जात आहेत. शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदेही यंदाची निवडणूक लढविण्याबाबत आग्रही आहेत. गेल्या निवडणुकीत ते इच्छुक नसतानाही त्यांना निवडणूक लढण्याची तयारी करण्यास सांगितले होते. त्यानुसार कसबा गणपतीचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली; परंतु काही तासांनंतर चित्र पालटले आणि मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर झाली होती. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असून, यंदाची निवडणूक लढविण्यास इच्छुकांची संख्याही प्रकर्षाने वाढल्याचे चित्र सध्या दिसते आहे.