• Sat. Sep 21st, 2024

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार; बचतगटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगासह रोजगार निर्मितीला मिळाली चालना ! – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

ByMH LIVE NEWS

Jan 9, 2024
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार; बचतगटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगासह रोजगार निर्मितीला मिळाली चालना ! – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 9 जानेवारी 2023 (जिमाका वृत्त)  :- जिल्ह्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण अंगीकारले असून, बचत गटांना त्यांच्या आवडीच्या प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासह रोजगार निर्मितीला चालना देण्यात आली असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.  ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार व तळोदा यांच्यावतीने आयोजित शेळी गट निवड पत्र वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जि.प.सदस्या अर्चना गावित, जयश्री गावित, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार (नंदुरबार), मंदार पत्की( तळोदा) यांच्यासह संबंधित अधिकारी व बचगटांच्या महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.

 

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, रोजगारासाठी परराज्यात येथील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना महिला बचतगटांच्या माध्यमातून गावातच प्रक्रिया उद्योगासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव सारख्या दुर्गम भागातील 3 हजार महिलांना सव्वाआठ कोटी रूपये आजपर्यंत वितरीत करण्यात आले आहेत. तसेच आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून बचगटासाठी महूफुलावर प्रक्रिया करून चॉकलेट,बिस्किटे, लाडू बनविण्यासाठी एक कोटी रूपयांचे वितरण करण्यात येत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, तोरणमाळ, साक्री सारख्या परिसरातून ज्वारी, बाजरी, भगर या सारख्या पदार्थ्यांच्या प्रक्रिया उद्योगांनाही अनुदान देण्यात आले आहे. जानेवारी अखेरपर्यंत प्रत्येक बचतगटा स दहा हजार रूपये अनुदान रूपाने वितरित केले जाणार असल्याचेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

मागेल त्याला घर

जिल्ह्यातील एकही गरजू व पात्र बेघर व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही यासाठी, पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून सव्वालाख घरे मंजूर करण्यात आली असून जिल्ह्यात घरकुलांचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्याचा मानस आहे. तसेच जिल्ह्यातील कुठल्याही जाती-जमातीचा बेघर या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठीही सुक्ष्म नियोजन करत असल्याचे यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

 

विद्युतीकरणासह पाणी, गॅस देणार

जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात विद्युतीकरण करण्यासाठी सुमारे 27 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला असून घरोघरी वीज, जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी, गॅस जोडणी याराख्या आवश्यक गरजांची पूर्ती शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, असेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी नंदुरबार प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील 16 गटांना शेळी गट निवडपत्र आणि एका कंपनी गटाला प्रक्रिया उद्योगासाठी एक कोटी कूपयांचा धनादेश, तळोदा प्रकल्प कार्यक्षेत्रातील 31 बचत गटांना शेळी गट निवडपत्र व मत्स्य व्यवसाय कंपन्यांना प्रत्येकी एक कोटी रूपयांच्या धनादेशांचे वितरण मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

 

डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया ताई गावित यांनी यांनी प्रत्येक महिलेला स्वबळावर उभे करण्याचे आमचे ध्येय आहे असे सांगून उपस्थित महिलांना उज्वला गॅस, जल जीवन मिशन, हर घर जल योजना, हर घर बिजली वगैरे योजनांचे महत्त्व समजावून सांगितले.

 

डॉ. हिना गावित म्हणाल्या

लोणचे पापड शेवया अशा पारंपारिक खाद्यपदार्थांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन बनवले आणि विकले तर मोठा गृह उद्योग महिलांच्या आधार बनू शकतो त्याचबरोबर घरात साठवलेल्या कांद्याची पावडर बनवण्या सारख्या नव्या उद्योग व्यवसायांची उभारणी महिला करू शकतात, म्हणून केंद्र  सरकारने विविध योजना दिल्या आहेत त्याला आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या निधीची जोड दिली आहे, त्याचा लाभ आपल्या भागातील समस्त महिलांनी घ्यावा; असे आवाहन खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी यावेळी केले.

एका नजरेतून

◼️ बचतगटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगासह रोजगार निर्मितीला चालना

◼️दुर्गम भागातील 3 हजार महिलांना सव्वा आठ कोटींचे वितरण

◼️महूफुलाच्या माध्यमातून लाडू, बिस्किटे, चॉकलेट बनविण्याच्या प्रक्रिया उद्योगांना 1 कोटी

◼️पंतप्रधान घरकुल योजनेतून सव्वा लाख घरे मंजूर

◼️जिल्ह्यात विद्युतीकरणासाठी 27 कोटी रूपयांचा निधी

◼️जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरोघरी पाणी

◼️ ज्वारी, बाजरी, भगर यासारख्या प्रक्रिया उद्यांगांनाही प्रोत्साहन

◼️घरकुलापासून कुठल्याही जाती-जमातीचे गरजू वंचित राहणार नाहीत.

 

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed