शरद मोहोळसोबत पूर्वी काम करणारा साथीदार साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर व त्याच्या दोन साथीदारांनी मोहोळचा खून करण्यापूर्वी त्याच्यावर दहा-बारा दिवसांपासून पाळत ठेवली होती. खून करण्यापूर्वी साहिल उर्फ मुन्ना सकाळपासून मोहोळसोबतच होता. आर्थिक किंवा जमीन व्यवहाराच्या वादातून ही घटना घडल्याचा कयास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी आज शरद मोहोळच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या भेटीनंतर शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्या भाजपच्या पदाधिकारी आहेत.
मी शरद नावाच्या वाघाची वाघिण, मरेपर्यंत हिंदुत्वाचं काम करेन
शरद मोहोळची पत्नी म्हणाली, “माझा नवरा हिंदुत्वासाठी लढत होता. त्यांची हत्या करणाऱ्यांना वाटत असेल की त्यांचा खून करून मी खचून जाईल, ते कदापि शक्य नाही. कारण शरद मोहोळ वाघ होता आणि मी त्याची वाघिण आहे. मी श्वासात श्वास असेपर्यंत हिंदुत्वाचं काम करेन”
मोहोळ कुटुंबियांचं हिंदुत्वासाठी निर्विवाद काम
नितेश राणे म्हणाले, शरद मोहोळ हे हिंदुत्ववादी कार्यकर्ता होते. हिंदुत्वाचं कुठलंही काम असो, शरद मोहोळ तिथे हजर असायचे. कार्यकर्त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असायचे. एकंदर मोहोळ कुटुंबियांचं हिंदुत्वासाठी निर्विवाद काम होतं. आज मोहोळ कुटुंबीय संकटात असताना स्वाती वहिनींना आधार देण्यासाठी मी पुण्यात आलो. मोहोळ कुटुंबियांना आधार देणं ही माझी नैतिक जबाबदारी होती.
कातिल सिद्दिकीच्या खुनामुळे देशभर चर्चेत
शरद मोहोळ हा कुख्यात गुंड होता. त्याच्यावर खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी, अपहरण यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ हा कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा विश्वासू साथीदार होता. टोळीयुद्धातून शरद मोहोळ व त्याच्या साथीदारांनी नीलायम चित्रपटगृह परिसरातील एका हॉटेलमध्ये प्रतिस्पर्धी गणेश मारणे टोळीतील किशोर उर्फ पिंटू मारणे याच्यावर गोळीबार करून खून केला होता. या खून प्रकरणात त्याला अटक झाली होती, तसेच जामीनही झाला होता. त्यानंतर दासवे येथील सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील दोषी कातिल सिद्दिकीच्या खूनाचाही मोहोळ याच्यावर आरोप होता. पुढे मोहोळच्या पत्नीने भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सुतारदरा परिसरात काम सुरू केले होते.