• Sat. Sep 21st, 2024

मोशीत सांडपाणीमिश्रित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, महापालिकेला सापडेना गळती

मोशीत सांडपाणीमिश्रित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, महापालिकेला सापडेना गळती

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : मोशीतील संतनगर सेक्टर नंबर चार परिसरात मागील एक आठवड्यापासून सांडपाणीमिश्रित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी, नागरिकांच्या घरात येणाऱ्या पाण्यात अक्षरशः आळ्या आढळल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, १० दिवस दूषित पाण्याचा पुरवठा होत असतानाही महापालिकेला अद्याप पाइपलाइनमधील लीकेज सापडलेले नाही.

सातत्याने विस्कळीत पाणी

महापालिका चिखली आणि निगडीतील जलशुद्धीकरणातून शहरवासीयांना पाणीपुरवठा करते. मोशी परिसर दाट लोकवस्तीचा आहे. या भागात मोठमोठ्या गृहनिर्माण संस्था विकसित झाल्या आहेत. या भागात सातत्याने विस्कळीत पाणीपुरवठा होतो.

उलट्या, जुलाबाचा त्रास

संतनगर सेक्टर नंबर चार केंद्रीय विहारशेजारी शिवगंगा सिद्धी अपार्टमेंटसह विविध सोसायट्या आहेत. या परिसरात होणारा पिण्याच्या पाणीपुरवठ्यात सांडपाणी मिश्रित होत आहे. त्यामुळे हे पाणी वापरल्याने लहान मुले; तसेच ज्येष्ठ नागरिक यांना उलट्या; तसेच जुलाबाचा त्रास होत आहे.

प्रश्न ‘जैसे थे’च

या प्रश्नाबाबत स्थानिक माजी नगरसेवक विलास मडिगेरी यांनी दखल घेऊन पाइपलाइन साफ केली. त्यांनी नवीन चेंबर तयार करून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला; परंतु अजूनही प्रश्न सुटलेला नाही. महापालिकेच्या वतीने जेसीबी पाठवून रस्त्यावर आठ ते दहा ठिकाणी खोदकाम करण्यात आले. मात्र, ती आठवड्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
पडघ्यात वर्षभर पाणीटंचाई; दोन दिवसांतून एकदा मिळते अपुरे आणि अशुद्ध पाणी
दहा दिवसांनंतरही प्रश्न कायम

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झालेला आहे. शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र अधिकाऱ्यांना एवढे खोदकाम करूनही ‘फॉल्ट’ सापडलेला नाही. लीकेजमुळे पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिश्रित होत असल्याचा अंदाज महापालिकेचे अधिकारी बांधत आहेत. मात्र, १० दिवस होऊनही हे लीकेज अधिकाऱ्यांना सापडलेले नाही. अगोदरच एक दिवसाआड पाणीपुरवठा आणि तेही दूषित पाणी येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन विभागमध्ये समन्वय नाही. या समन्वयाच्या अभावामुळे मोशीत नक्की कोणत्या कारणाने दूषित पाणी येत आहे, हे निश्चित होत नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित याचा शोध घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात.- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन

मोशीतील काही भागांत लीकेजमुळे सांडपाणीमिश्रित पाणीपुरवठा होत होता. तक्रार प्राप्त होताच लीकेज काढण्यात आले; तसेच चेंबर साफ करून घेण्यात आले. अद्यापही कोणाची दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार असल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.- शेखर गुरव, उप अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed