पुणे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सुपर वॉरिअर्सची बावनकुळे यांनी शनिवारी बैठक घेतली. त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रकाश जावडेकर, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. दरम्यान, मनसेचे मंदार बलकवडे यांनी भाजपात प्रवेश केला.
प्रवेशासाठी भाजपचे दार खुले
‘गेल्या २०-२५ वर्षात जे जे आमदार खासदार झाले, नगरसेवकांपर्यंत जे निवडणुकांमध्ये पडले असले तरी अशा नेत्यांना पक्षात घ्या आणि कामाला लावा, असे आदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात पक्षात मोठे प्रवेश होणार असून नागपुरात चार हजार जणांना प्रवेश दिला आहे. प्रवेशासाठीची मोठी यादी तयार आहे. प्रवेशासाठी भाजपने दार खुले केले आहे. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात. तुमच्या जीवावर कोणीतरी बाहेरचा येईल आणि मोठा नेता होईल. हे तुम्हाला मान्य आहे का,’ असा सवाल करीत ‘मला मान्य नाही. त्यामुळे तुम्ही कामाला लागा,’ अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुपर वॉरिअर्सना केली आहे.
तीन तास, तेरा महिने
सुपर वॉरिअर्सला कानमंत्र देताना बावनकुळे म्हणाले, ‘पक्षासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने रोज तीन तास दिले पाहिजे. उद्या लोकसभा निवडणुका आहेत. त्यानंतर विधानसभा आणि डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे तेरा महिने कार्यकर्त्यांनी कष्ट केले पाहिजे. प्रत्येक बूथची बैठक घेऊन तेथे सुमारे १०० ते १५० नागरिकांना बोलवा. त्यांच्यासोबत ‘मन की बात’ करा. गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजनांची माहिती द्या. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळावे यासाठी सुपर वॉरिअर्स ही संकल्पना राबविली आहे.’
चंद्रकांतदादांची सारवासारव
पुण्यातील बैठकीत प्रदेशाध्यक्षन बावनकुळे यांनी कामाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांची बाजू सावरून घेतली. लोकापर्यंत पोहोचण्यासाठी पुण्यातील कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने काम करतील. पुढील वेळी पुण्याबद्दल तक्रार करण्याची संधी देणार नाही. शहरातील कोणत्याही सुपर वॉरिअर्सला बदलावे लागणार नाही, अशा शब्दांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांना आश्वासन दिले. ‘मकर संक्रांतीनिमित्ताने पुणे शहरात एक लाख घरात तिळगूळ वडी, एक लाख घरात हळकी कुंकवाचे वाण आणि एक लाख महिलांना साडी देणार आहोत. पक्ष वाढीसाठी काम करताना साधणांची कमी पडणार नाही याची काळजी घेऊ,’ असेही पाटील म्हणाले.