याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांनी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी साईरूचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या अहमदनगर-गोवा बसचे तिकीट ऑनलाईन रेडबस या कंपनीच्या वेबसाईटवरून आरक्षीत केले होते. तसेच तिकिटांचे पैसेही त्यांनी ऑनलाईन भरले होते. त्यानुसार तक्रारदार २ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रवास करणार होते. परंतु तक्रारदार २ नोव्हेंबरला बस ज्या ठिकाणावरून सुटणार होती, तेथे गेले असता साईरूचा ट्रॅव्हल्सच्या ऑपरेटर कडून मार्ग वळवल्यामुळे बस रद्द करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात आली.
ऑपरेटरने रेड बस यांना बस मार्ग बदलल्याचा रिपोर्ट १५ दिवस अगोदर दिला असल्याचे सांगितले आहे, अशीही माहिती दिली. परंतु रेड बसकडून तक्रारदार यांना बस रद्द झाल्याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती.
त्यामुळे जाब विचारण्यासाठी तक्रारदाराने रेडबस यांच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, रेड बसच्या कस्टमर केअर कडून बस रद्द केल्याचा संदेश तुम्हाला मिळेल असे सांगण्यात आले. तसेच केलेल्या बुकिंगचे पैसे लगेच तक्रारदारास परत करण्यात आले होते. परंतु पर्यायी व्यवस्था करण्यात रेडबसने कुठलीही तयारी दर्शविली नाही.
रेड बस यांनी कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने अचानक बस रद्द झाल्यामुळे गैरसोय झाली व आर्थिक नुकसान झाले व मानसिक त्रास सहन करावा लागला, अशी तक्रार तक्रारदाराने जिल्हा ग्राहक मंचाकडे केली होती. अखेर याबाबत ग्राहक मंचांनी निकाल दिला असून तक्रारदार नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये ४ हजार व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये २ हजार देण्याचे आदेश मंचाने दिले आहेत.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News