महाडिक पाटील वाद शिगेला
कोल्हापुरातील राजकारणात महाडिक पाटील वाद नवा नाही. कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये सध्या अमल महाडिक यांची सत्ता आहे. तर त्यांच्या विरोधात सतेज पाटील गट आहे. गेल्या निवडणुकीत महाडिक गटाने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून विरोधी गटाच्या सभासदांचे ऊस कारखान्याला घेऊन जात नसल्याचे आरोप करत आमदार सतेज पाटील यांनी आज साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढत तक्रार दाखल केली असून आपल्यावर अन्याय होत असल्याबाबत निवेदन देऊन न्याय मिळण्यासाठी विनंती केली आहे. तसेच आठ दिवसाचा अल्टिमेटम देत विरोधी सभासदांचे ऊस घेतले नाही तर मी स्वतः सभासद घेऊन कारखान्यावर येईन असा इशाराही सतेज पाटील यांनी आज सकाळी दिला आहे.
काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस त्यांचे काम संपवून कसबा बावडा येथील मुख्य मार्गावरून जात असताना पाटील गल्लीसमोर संतप्त झालेल्या शेतकरी सभासदांनी त्यांची गाडी अडवली. चिटणीस यांना काही कळण्याच्या आतच गाडीतून बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये गाडीचा दरवाजा तोडण्यात आला असून मारहाणीचे व्हिडिओ आता सोशल मीडिया मध्ये व्हायरल होऊ लागले आहेत. मारहाणीनंतर येथील काहींनी मध्यस्थी करून कार्यकारी संचालक चिटणीस यांना पुन्हा गाडीत बसवत त्यांची गाडी मार्गस्थ केली.
दहा मिनिटे सुरू असलेल्या या मारहाणीत रस्त्यावर मोठी वाहतुक कोंडी झाली. या मारहाणीत कार्यकारी संचालकांचे कपडे फाटले असून त्यांना जबर मार लागला आहे. दरम्यान या सर्व मारहाणी विरोधात महाडिक गट आक्रमक झाला असून पोलीस अधीक्षक कार्यालयात महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. यामुळे राजाराम कारखान्यातील महाडिक पाटील वाद हा आता आणखी चिघळला आहे.